Maratha reservation : हैदराबाद गॅझेटचा जीआर संकटात, ओबीसींचं ठरलं, नागपुरातल्या बैठकीत मोठा निर्णय

सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भातील जीआर काढण्यानंतर आता ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला आहे, आज नागपुरात महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Maratha reservation : हैदराबाद गॅझेटचा जीआर संकटात, ओबीसींचं ठरलं, नागपुरातल्या बैठकीत मोठा निर्णय
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 13, 2025 | 6:10 PM

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने राज्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्या संदर्भात जीआर देखील काढण्यात आला आहे, मात्र हा जीआर निघाल्यानंतर आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण नको ही या समाजाची पहिल्यापासून भूमिका आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आज नागपूरमध्ये ओबीसी समाजाची बैठक पार पडली, या बैठकीला ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांची देखील उपस्थिती होती, या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले वडेट्टीवार? 

या जीआरने मागसलेल्या लोकांच्या अधिकारांवर गदा आणण्याचं काम केलं आहे, कोणी कितीही म्हटलं की जीआरमुळे ओबीसीला धक्का लागणार नाही, मात्र धक्का बसला आहे.   ओबीसींचं मोठ नुकसान झालं आहे,  10 ऑक्टोबर रोजी ओबीसीचा प्रचंड मोठा महामोर्चा नागपुरात आयोजित करण्याचे या बैठकीत ठरले आहे,  नागपूरच्या यशवंत स्टेडियममधून हा मोर्चा निघेल आणि संविधान चौकामध्ये या मोर्चाची सांगता होईल अशी माहिती यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

दरम्यान आज वकिलांशी आमची बैठक झाली आहे, सोमवारी आम्ही नागपूर खंडपीठात पिटीशन दाखल करणार आहोत, इतर खंडपीठांमध्येही त्या -त्या ठिकाणचे कार्यकर्ते याचिका दाखल करतील, अशी माहिती यावेळी वडेट्टीवार यांनी दिली आहे.  मुख्यमंत्र्यांनी आम्हाला बोलवावं आणि चर्चा करावी,  जो कोणी या जीआरचं समर्थन करत असेल, तो ओबीसींच्या लढ्याशी प्रामाणिक नाही असंच आमचं म्हणणं आहे, असंही यावेळी ते म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही पक्ष म्हणून ही लढाई लढत नाही, तर ओबीसी समाजासाठीची ही लढाई आहे,  त्यात कार्यकर्ता म्हणून आम्ही सहभागी आहोत. त्यामुळे या मोर्चात पक्षाच्या भूमिका बाजूला ठेवून जो जो या आंदोलनात येईल तो या मोर्चात सहभागी होऊ शकतो.  या जीआर विरोधात ज्याला ज्याला राग आहे, रोष आहे त्याने या मोर्चात यावं असे आमचं आवाहन आहे, असंही यावेळी वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.