मोठी बातमी! मराठा आंदोलन पेटलं, आंदोलकाकडून थेट मंत्र्याच्या गाडीचा पाठलाग, सोलापुरात राडा

मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत, अंतरवाली सराटीमध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे. याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहेत.

मोठी बातमी! मराठा आंदोलन पेटलं, आंदोलकाकडून थेट मंत्र्याच्या गाडीचा पाठलाग, सोलापुरात राडा
मराठा आरक्षण आंदोलन
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 4:03 PM

मोठी बातमी समोर येत आहे, मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. ते पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. हे निर्णायक उपोषण असेल असा इशाराही त्यांनी यावेळी सरकारला दिला आहे. जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मुंबईला धडक देणार असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. मुंबईमध्ये 6 कोटी मराठा समाज येईल असं ते यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर आता त्याचे पडसाद राज्यभरात उमटायला सुरुवात झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथे रास्तारोको करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील वाहनं अडवण्यात आली आहेत. आंदोलकांनी रस्त्यातच बेमुदत रास्तारोकोचं बॅनर लावल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे सोलापुरातून देखील एक मोठी बातमी समोर आली आहे.

सोलापूरच्या माढामध्ये मराठा आंदोलकाने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची गाडी अडवली आहे. धावत्या गाडीमागे पळत जाऊन या आंदोलकाने बाबासाहेब पाटील यांच्या गाडीखाली घुसण्याचा प्रयत्न केला.  बापू गायकवाड असं या मराठा आंदोलकाचं नाव आहे. त्याने सहकार मंत्र्यांच्या धावत्या गाडीचा पाठलाग केला, त्यानंतर तो थेट गाडीखाली घुसला त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील देण्यात आल्या. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकाला गाडीखालून ओढत बाहेर काढले.  आंदोलकाला बाहेर काढण्यात आल्यानंतर बाबासाहेब पाटील यांचा ताफा तुळजापूरच्या दिशेनं रवाना झाला आहे. दरम्यान जेव्हा ही घटना घडली तेव्हा बाबासाहेब पाटील हे आपल्या वाहनातच होते, मात्र ते खाली न उतरता वाहनातच बसून राहिल्याचं पहायला मिळालं.

मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा  

दरम्यान काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपण 29 ऑगस्टपासून आंदोलन करणार आहोत असा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी आता पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे. आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालं आहे, मागण्या मान्य न झाल्यास मराठा समाज मुंबईत धडकणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

 

 

Follow Us