मनोज जरांगेंनी ती स्क्रिप्ट फोडली.., अजित पवारांचं नाव घेत लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाबाबत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र टीका केली आहे. हाके यांनी हे आंदोलन सरकार उलथून टाकण्याचा राजकीय कट असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अजित पवार गट आणि विरोधी पक्षांवरही गंभीर आरोप केले आहेत.

मनोज जरांगेंनी ती स्क्रिप्ट फोडली.., अजित पवारांचं नाव घेत लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक दावा
laxman hake ajit pawar
| Updated on: Aug 29, 2025 | 1:14 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक दिली आहे. याच मागणीसाठी मनोज जरांगेंनी थेट मुंबई गाठत आंदोलन सुरु केले आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा बांधवांचं आरक्षणाच्या मागणीसाठी भगवं वादळ धडकलं आहे. आता या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. लक्ष्मण हाके यांनी मराठा आंदोलनावर आणि अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. मराठा आरक्षणाचा लढा हा केवळ आरक्षणासाठी नसून, राज्यातील सरकार उलथून टाकण्यासाठी एक राजकीय अजेंडा आहे. या कटात विरोधी पक्ष तर सामील आहेत, पण त्याचबरोबर अजित पवार गटाचे आमदार आणि खासदार देखील सहभागी आहेत, असा गंभीर आरोप केला आहे.

लक्ष्मण हाके यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेवेळी लक्ष्मण हाकेंनी अजित पवराांवर गंभीर आरोप केले. आज मी जबाबदारीने सांगतो की, देवेंद्र फडणवीसांचे सरकार उलथवून लावण्यासाठी विरोधी पक्ष त्यात सहभागी असेल असं मी आजपर्यंत म्हणायचो. पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी ज्याप्रमाणे विरोधी पक्षाचे नेते सामील आहेत, तसेच अजित पवारांचे आमदार खासदार त्यात सहभागी आहेत. हे मी जबाबदारीने सांगतोय. मला राजकीय काहीही बोलायचं नाही. पण जरांगे नावाच्या चेहऱ्याआडून या महाराष्ट्रातील आमदार खासदार सरकार अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करतात. आरक्षण हा विषय नाही. जर जरांगेंची मागणी पूर्ण झाली तर राज्यातील ओबीसींचे आरक्षण संपलेले असेल, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

जरांगे हुकूमशाहा आहेत का?

या महाराष्ट्रात धुंदशाही जोमात सुरु आहे. पण लोकशाही कोमात आहे. झुंडशाहीचा जोरावर महाराष्ट्रातील ओबीसी रचना संपवण्याचा घाट टाकला जात आहे. मनोज जरांगेंच्या नावाच्या काडेपेटीचा ज्वालामुखी केला. हे काम सर्वपक्षीय आमदार खासदारांनी केल. जरांगे नावाच्या काडेपेटीला ओबीसीतून आरक्षण का पाहिजे? जरांगे हुकूमशाहा आहेत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत, असा घणाघात लक्ष्मण हाके यांनी केला.

मी चुकीचा असेल तर मला आतमध्ये टाका

हा आरक्षणाचा लढा नाही. मनोज जरागेंनी मुंबईकडे निघताना स्क्रिप्ट फोडली की मी सरकार उलथून लावणार असेही सांगितले होते. मी आमदार-खासदाराचा पोरगा नाही, मी चुकीचा असेल तर मला आतमध्ये टाका,” असे आव्हान लक्ष्मण हाकेंनी केले. “मी आत्महत्या करू का, म्हणजे प्रश्न सुटतील का?” असे भावनिक विधान करत हाकेंनी आपली व्यथा मांडली.

अजित पवार मुख्यमंत्र्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न करतात

अजित पवारांचे आमदार जरांगे यांच्या आंदोलनाला रसद पुरवतात. अजित पवार हे मुख्यमंत्र्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे. आता आम्ही उद्या पुण्यात बैठक घेणार आहोत. त्यानंतर आंदोलनाची दिशा स्पष्ट करु. आम्ही ओबीसी जोडो अभियान सुरु करु. ओबीसी मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी. ओबीसी मंत्र्यांना ओबीसी माफ करणार नाहीत, असेही लक्ष्मण हाके म्हणाले.