जरांगे पाटलांचा निरोप आला, महापालिका निवडणुकीत पाठिंबा कोणाला? मतदानाच्या आदल्या दिवशीच सर्वात मोठी घोषणा
शुक्रवारी राज्यात 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र मतदानाच्या एक दिवस आधीच सर्वात मोठी बातमी समोर आली आहे, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपली पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर केली आहे.

गुरुवारी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वीच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नावानं काही जुन्या व्हि़डिओ क्लिप व्हायरल करण्यात येत आहे, या व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी या पक्षाला पाठिंबा दिला, जरांगे पाटील यांनी त्या पक्षाला पाठिंबा दिला, असे दावे करण्यात येत आहेत. त्यामुळे अनेकांची दिशाभूल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अखेर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्ते विरेंद्र पवार यांना फोन करून आपली भूमिका सांगितली आहे, त्यानंतर त्याबाबत विरेंद्र पवार यांनी त्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली.
नेमकं काय म्हणाले विरोद्र पवार?
‘मुंबईमध्ये निवडणुकीचं वातावरण खूप जोरदार सुरू आहे. त्याचप्रमाणे एका विशिष्ठ पक्षाला पाठिंबा द्यायचा, किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाच्या विरोधात काम करायचं अशा भूमिका देखील जोरदारपणे घेतल्या जात आहेत, आणि त्यासंदर्भामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मला फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की आपण या निवडणुकीत कोणत्या पक्षाला आणि कोणालाही कसलाही पाठिंबा दिलेला नाहीये. माझे जे जुन्या फितीचे व्हिडीओ आहेत, त्यांना कट करून त्याला इडिट करून व्हायरल केले जात आहेत, तशा पद्धतीचे वातावरण निर्माण केलं जात आहे. आपले लोक सर्व पक्षांमध्ये आहेत, आणि आपले जे सर्व पक्षांमध्ये मराठा कार्यकर्ते आहेत त्यांनी मराठा मोर्चामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी आपल्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी काम केलेलं आहे. अशावेळी एखाद्या विशिष्ट पक्षाला पाठिंबा देणं किंवा त्याचं समर्थन करणं हे योग्य होणार नाही, आणि त्या पद्धतीचा निरोप त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचवला आहे, असं यावेळी विरेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना पवार यांनी असं म्हटलं की, कोणत्याही पक्षाला महापालिका निवडणुकीत समर्थन दिलेलं नाही. मागच्या काही व्हिडीओ क्लीप व्हायरल करून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला जात आहेत. त्यामुळे आपण मुंबईमध्ये कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्या नेत्याला समर्थन दिलेलं नाही. ज्यांनी -ज्यांनी आपल्यासाठी काम केलं, मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा आरक्षणासाठी गेल्यावर्षी मुंबईत काढण्यात आलेला मोर्चा असेल त्याला -त्याला ज्यांनी पाठिंबा दिला, काम केलं, त्यांना मतदान करावं. कोणत्याही एक पक्षाचं समर्थन करू नये, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांची असल्याचं यावेळी विरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.