पुण्यात विवाहितेने संपवले जीवन, माहेरच्या मंडळींनी मंगल कार्यालयाची केली तोडफोड
पुण्यातील मुकुंदनगरमध्ये विवाहितेने सासरच्या छळाला कंठाळून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या विवाहितेचा सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप या विवाहितेच्या कुटुंबियांनी केला आहे.

दिपक कापरे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : – पुण्यात पुन्हा एकदा एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून जीवन संपवल्याची घटना घडली आहे. पायल अक्षय झांबरे असे मृत महिलेचे नाव असून सासरच्या मंडळींनी हुंडा तसेच सोन्याच्या मागणीसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. दरम्यान झांबरे यांच्या मालकीच्या झांबरे पॅलेस मंगल कार्यालयाची माहेरच्या मंडळींनी तोडफोड केल्याची घटना घडली आहे.
पुण्यातील मुकुंदनगर परिसरात अक्षय हाईट्स सोसायटीतील जुन्या फ्लॅटमध्ये सोमवारी पायल यांचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पायल या एका आयटी कंपनीत कार्यरत होत्या. त्यांचा अक्षय झांबरे यांच्याशी सुमारे पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दाम्पत्याला एक मुलगी आहे.
पायल या रविवार रात्रीपासून दिसत नसल्याची माहिती त्यांच्या चुलत सासूने भावाला दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर पायल यांचे भाऊ ऋषिकेश यांना तिची माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पायल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पायल यांचे चुलत भाऊ जनार्दन पवार यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीच्या काळात दरवर्षी ५ ते १० तोळे सोन्याची मागणी केली जात होती. यंदा माहेरच्या कुटुंबीयांनी ही मागणी पूर्ण करण्यास नकार देत पुढील वर्षापर्यंत थांबण्याची विनंती केली होती. मात्र, त्यानंतरही पायल यांच्यावर दबाव टाकण्यात आला आणि त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरूच राहिला, असा आरोप पवार यांनी केला आहे.
