हुंड्यासाठी तगादा लावल्याने उचललं टोकाचं पाऊल, 9 महिन्याची लेक आईच्या मायेपासून पोरकी, उल्हासनगरात हळहळ!
माहेरून आणखी हुंडा घेऊन येण्याची मागणी करत तिचा छळ करण्यात आल्याचा आरोप नित्याच्या वडिलांनी केला आहे. तसेच मुलगी झाली म्हणून सासू माधुरी राय आणि आजी सासू शारदा राय यांनीही नित्याला त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

Ulhasnagar Women Death : लग्न झाल्यानंतर एक मुलगी पत्नी, सून, वहिनी अशा भूमिका पार पडते. आपल्या जन्मघराला सोडून सासरी आयुष्यभर नांदते. आपलं सर्वस्व देऊनही अनेक महिलांवरील छळ काही कमी झालेले नाहीत. राज्यात नेहमीच कौटुंबिक हिसेंच्या घटना घडतात. उल्हासनगरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका 28 वर्षीय विवाहितेने कथितपणे हुंड्याच्या छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं आहे. विशेष म्हणजे या महिलेला अवघ्या 9 महिन्यांची मुलगी आहे. या चिमुकलीच्या डोक्यावरचे आईचे छत्र आता हरवले आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नेमकं काय घडलं?
अवघ्या ९ महिन्यांचा चिमुकली आईच्या मायेपासून दुरावली आहे. ही धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 28 वर्षीय उच्चशिक्षित विवाहितेने घरात गळफास घेऊन जीवन संपवले आहे. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी तगादा लावला जात होता. तसेच घरगुती कारणांवरून होत असलेल्या कथित छळाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
चार लाख रुपये रोख हुंडा, संसारोपयोगी साहित्य दिले
मृत विवाहितेचं नाव नित्या राय असून डिसेंबर 2021 मध्ये तिचा विवाह उल्हासनगरातील गौरव राय याच्यासोबत झाला होता. गौरव हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून नित्या यांनी एमएससी, बीएडपर्यंत शिक्षण घेतलेले होते. लग्नावेळी नित्याच्या वडिलांनी जवळपास पावणे चार लाख रुपये रोख हुंडा, संसारोपयोगी साहित्य आणि लग्नाचा संपूर्ण खर्च केला होता, असा दावा पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत करण्यात आला आहे. मात्र, लग्नानंतर नित्याचा कथित छळ सुरू झाल्याचा आरोप आहे. घरातील काम व्यवस्थित करत नाही, या कारणावरून तिच्याशी वाद घातले जात होते.
9 महिन्यांच्या मुलीच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं
त्यानंतर माहेरून आणखी हुंडा घेऊन येण्याची मागणी करत तिचा छळ करण्यात आल्याचा आरोप नित्याच्या वडिलांनी केला आहे. तसेच मुलगी झाली म्हणून सासू माधुरी राय आणि आजी सासू शारदा राय यांनीही नित्याला त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या छळाला कंटाळून नित्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असं तक्रारीत म्हणण्यात आलंय. या घटनेनंतर तिच्या 9 महिन्यांच्या मुलीच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपलं आहे.
आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी
नित्याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पती गौरव संजय राय, सासू माधुरी संजय राय आणि आजी सासू शारदा राय यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पती गौरव राय याला अटक केली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर अवताडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
