धनंजय मुंडेंच्या भेटीवरून गदारोळानंतर सुरेश धस पहिल्यांदाच मस्साजोगमध्ये, म्हणाले…
आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग गावात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्याची आणि खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर धसांनी सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्याचे आश्वासन दिले. धस यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्याचीही मागणी केली.

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज मस्साजोग गावात जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आकाचे आका म्हणत मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुरेश धस यांनी अनेक आरोप केले होते. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी त्याच धनंजय मुंडे यांची दोनदा भेट घेतल्याचं उघड झालं होतं. त्यावरून धसांवर अनेकांनी टीका केली होती, धसांचा यात काही डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या सर्व घटनानंतर आज सुरेश धस हे पहिल्यांदाच मस्साजोगमध्ये पोहोचले आणि त्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा होता नाही, कृष्णा आंधळे फरार आहे. याच पार्श्वभूमीवर न्यायाची मागणी करत मस्साजोगच्या गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनचा इशारा दिला आहे. याचदरम्यान आमदार सुरेश धस यांनी आज ग्रामस्थ आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेत त्यांची बाजू समजून घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना धस यांनी रोखठोक भूमिका मांडली. ” आरोपी तारखेला आल्यावर मोठमोठाले बूट घातलेले, चित्रविचित्र दिसणारे लोक कसे येतात. आरोपींची मनोबल वाढवण्यासाठी ते येतात. म्हणूनच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण आवश्यक आहे. कृष्णा आंधळे हा शातीर आहे, त्याला तात्काळ अटक करावी” अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली.
केजमधील काही पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी करावे. डॉ. संभाजी वायभासे आणि त्यांच्या पत्नी यांनी आरोपींना पैसे पाठवले आहे, यांना सहआरोपी करावे असे सांगत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपी पोलिसांचे मित्र असल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणात पोलिसांना सहआरोपी करा अशी मागणीही त्यांनी केली. तसेच सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल असे धस यांनी नमूद केलं.
खटला जलदगती न्यायालयात चालणार
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशीच सर्वांची मागणी आहे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी करण्यात येत आहे. ते नक्कीच होईल. हा खटला 100 टक्के फास्ट ट्रॅक कोर्टातच चालणार आहे, कारण या केसचा तपासही आता अंतिम टप्प्यात आला आहे.
चार्जशीट दाखल करण्यापूर्वी ग्रामस्थांनी 8 मागण्या केल्यात. संतोष देशमुख यांचे पार्थिव असलेली गाडी PSI राजेश पाटील यांनी कळंबकडे वळवली होती. पण ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर गाडी परत वळवली. त्यामुळे राजेश पाटील याला आरोपी केले पाहिजे. तसेच त्याचबरोबर नितीन बिक्कड याने आरोपीना पळून जाण्यास मदत केलीय त्यामुळे त्याला आरोपी केले पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. आत्तापर्यंत हा आरोपी आत जायला हवा होता, याची पण चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी धस यांनी केली.
सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवणार
संतोष देशमुखांच्या हत्येच्या केसमध्ये आत्तापर्यंत 9 आरोपी हे 302 मध्ये आले आहेत. 10 वा आरोपी अजून त्यात नाही. त्याचा रोल खंडणी आणि इतर प्रकरणात आहे. वाल्मिक कराडसह इतर 9 लोक हे 302 मध्ये आले आहेत. उपोषणाला बसू नका असे म्हणणार नाही. पण या आपल्या सर्व मागण्या मी मुख्यमंत्री यांच्या कानावर घालणार असल्याचे धस यांनी नमूद केलं. आरोपीला मदत करणाऱ्यांची जेल प्रशासनाकडून स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली. मी उद्या नागपूर किंवा मुंबईत मुख्यमंत्री यांची भेट घेणार. या मागण्यांची पूर्तता झाली तर 25 तारखेला मस्साजोग करांना आंदोलनाची गरज राहणार नसल्याचे धस म्हणाले. ॲडिशनल एसपी म्हणून पंकज कुमावत यांना बीडला आणावे अशी मागणी मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे धसही यांनी सांगितलं.
