
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अनेक घडामोडी सुरु आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाकडून एक मोठा दावा करण्यात आला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत भाजपचे नेते आशिष शेलार यांना महत्त्वाचे स्थान मिळू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ वरून सूत्रे हलवली जात आहेत, असा दावा सामना वृत्तपत्रातील रोखठोक या सदरातून करण्यात आला आहे. तसेच यात भाजपमध्ये कशाप्राकरे अंतर्गत कलह सुरु आहे, त्याबद्दलही भाष्य करण्यात आले आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत भाजपचे नेते आशिष शेलार यांना महत्त्वाचे स्थान मिळू नये यासाठी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा वरून सूत्रे हलवली जात आहेत. हा प्रकार भाजप विरुद्ध भाजप असा संघर्ष जागोजागी सुरू असल्याचे स्पष्ट करतो, असेही रोखठोकमध्ये नमूद करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सर्व काही आलबेल नाही हे आता उघड झाले आहे. गृहमंत्री अमित शहा भाजप कार्यालयाच्या भूमिपूजनासाठी मुंबईत आले. ते काहीतरी शुभ बोलतील असे वाटले होते, पण विरोधकांना संपवा. विरोधक दुर्बिणीतूनही दिसणार नाहीत असे करा, असे अभद्र बोलून ते निघून गेले. कोणत्या विरोधकांना अमित शहा पूर्णपणे संपवायला निघाले आहेत? असा सवाल सामनातून करण्यात आला आहे.
भाजप हा सध्या दोन खांबी तंबू आहे. दोन्ही खांबांना भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. एक खांब कलंडला तरी संपूर्ण भाजप पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून पडेल. भाजप कार्यालयाची कुदळ मारताना भाजपचे सर्व सावजी चिकन म्हणजे बाहेरून आलेले लोक व्यासपीठावर होते, पण ज्यांनी महाराष्ट्रातील भाजपसाठी खस्ता खाल्ल्या ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या महत्त्वाच्या सोहळ्यात कोठेच दिसले नाहीत. राण्यांपासून नार्वेकरांपर्यंत, राम शिंद्यांपासून विखे पाटलांपर्यंत सगळ्या उपऱ्यांची मांदियाळी तेथे होती. हे सर्व काँग्रेस, शिवसेनेतून गेलेले लोक. त्यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम आता मूळ भाजपवाल्यांना करावे लागेल, अशी टीकाही सामनातून करण्यात आली.
गडकरी व्यासपीठावर नव्हते हा भाजपचा अंतर्गत कलह आहे. त्यामुळे शहा हे कोणत्या दुर्बिणीतून विरोधकांचे अस्तित्व संपवणार आहेत. महाराष्ट्रात काय चालले आहे हे दुर्बिणीतून पाहिले तर शहांना कळेल की, भाजपच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत व पोलिसांच्या दंडुकेशाहीला ते घाबरत नाहीत. राज्यात सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. मुख्यमंत्री त्यावर काय करतात? असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.