
मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरु आहे. इराणकडून फक्त इस्रायल आणि अमेरिकेच्या तळावर नाही तर आखाती देशांमध्ये मिसाइल हल्ले सुरु आहेत. सौदी अरेबिया, ओमान, दुबई, कुवैत या ठिकाणी मागच्या काही दिवसात इराणने हल्ले केले आहेत. आखाती देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय राहतात. यात महाराष्ट्रीयन लोकही मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांना मायदेशात आणण्यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत, या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. “आम्ही WhatsApp नंबर दिलेला आहे. लोक त्यावर संपर्क साधत आहेत. त्यांच्या काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
“त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने सगळे प्रयत्न सुरु केले आहेत. मूळामध्ये आपल्याला माहितीय की एअर इंडियाची विमानं हळूहळू त्या ठिकाणी जाऊन लोकांना परत आणत आहेत. काही एअर स्पेसेस बंद आहेत, काही सुरु आहेत. जिथून आणणं शक्य आहे, तिथून आपण लोकांना आणत आहोत” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “कुवैतमध्ये समस्या आलेली, काही ट्रान्झिट पॅसेंजर आहेत. त्यांच्या व्हिसाच्या अडचणी होत्या. एम्बीसने प्रयत्न करुन त्यांना एका ठिकाणी थांबवलेलं आहे. त्यांना अडचण येणार नाही असा प्रयत्न आपल्यावतीने करण्यात आलाय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चीफ प्रोटोकॉल अधिकारी गावंडे यांच्याकडे काय जबाबदारी?
“परदेशात जिथे-जिथे आपली मराठी मंडळं आहेत, ती सक्रीय करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून आपले जे लोक आहेत, त्यांना मदत करतोय. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून गिरीश महाजन त्यांच्याशी बोलले आहेत. आपले चीफ प्रोटोकॉल अधिकारी गावंडे यांना ही जबाबदारी दिली आहे. कारण ते फॉरेन सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी एंबसीची बैठक घेतली. ज्या एसओपी आहेत, त्या नागरिकांना दिल्या आहेत. लोकांनी काय काय करायचं आणि काय करु नये हे पोहोचवलं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
.. तर गोंधळ होईल
“राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा करुन ही भूमिका मांडली होती की जे काही महाराष्ट्रातले लोक आहेत त्यांना परत आणण्यासाठी व्यवस्था करु इच्छितो. परंतु केंद्राने सांगितलं की, सगळ्याच राज्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतली, तर गोंधळ होईल. एअरस्पेस सुरक्षित नाहीय.असुरक्षित एअरस्पेस मध्ये एखादं विमान गेलं तर काय होऊ शकतो हे आपण समजू शकतो. केंद्र सरकार प्रयत्न करतय. आम्हाला लोकांचे मेसेजेस येतात. आम्ही MEA ला कळवतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मोदी सरकार संवेदनशील
“हेल्पलाईनच्या माध्यमातून जी मदत करणं शक्य आहे ती करत आहोत. मिहिर कोटेचा यांनी दुबईत अडकलेल्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था केली आहे. पाच-दहावर्षातला अनुभव बघितला तर पर्यटक, विद्यार्थी असो मोदी सरकार संवेदनशील आहे. विपरित परिस्थितीचा सामना करत लोकांना परत आणलं आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.