गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न: उद्याच्या आझाद मैदानातील आंदोलनाला उध्दव ठाकरे,पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती

कामगार संघटनांचा उद्या ९ जुलै ( बुधवारी) रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. याच वेळी मुंबईतील आझादमैदानात गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सकाळी ११ वाजता गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचा मोर्चा निघणार असून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न: उद्याच्या आझाद मैदानातील आंदोलनाला उध्दव ठाकरे,पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती
Uddhav Thackeray
| Updated on: Jul 08, 2025 | 9:19 PM

गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर एकजूट झालेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील १४ कामगार संघटनांच्या “गिरणी कामगार संयुक्त लढा समिती”च्या वतीने उद्या बुधवार दिनांक ९ जुलै सकाळी ११ वाजता आझाद‌ मैदानात जाहीर सभा होणार‌‌ आहे.‌ आधी भायखळा-राणीबाग ते विधानभवन पर्यंत कामगारांचा धडक “लाँगमार्च’ आयोजित करण्यात आला होता.परंतु पोलिसांनी याला परवानगी नाकारल्यामुळे,आता आझाद मैदानावर ही सभा पार पडेल,अशी माहिती गिरणी कामगार लढा समितीचे प्रमुख आमदार सचिन अहिर यांनी येथे दिली.या मोर्च्याला शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची तातडीची‌ बैठक आज मिल मजदूर मंझीलमध्ये पार पडली‌.आझाद‌ मैदानावरील ही‌ सभा भव्य करण्याचा निर्धार कामगार नेत्यांनी व्यक्त केला आहे.कॉ.विजय कुलकर्णी, हेमंत गोसावी, आनंद मोरे, हरिनाथ तिवारी, निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, रमाकांत बने,राजेंद्र साळस्कर आदी कामगार नेते उपस्थित होते. उद्याच्या आझाद मैदानवरील सभेत विधान‌ परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर, शिवसेनेचे उपनेते आमदार अनिल परब ‌आदी मान्यवर‌‌ नेते उपस्थित राहणार आहेत.कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारकडून चाललेल्या फसवणुकी विरुद्ध आवाज उठवून हे नेते कामगारांच्या अन्यायाला वाचा फोडणार आहेत.

तर आंदोलनाचे पुढील पाऊल उचलणार

‌ ‌ या बैठकीत अनेक कामगार कार्यकर्त्यांनी सरकारकडून जोपर्यंत आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन छेडण्याचाही मनोदय‌‌ व्यक्त करण्यात आला. उद्याच्या आंदोलनात लढा समितीचे निमंत्रक गोविंदराव मोहिते आपल्या प्रास्ताविक भाषणात गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकारने स्वीकारलेल्या वेळ काढू धोरणावर प्रहार करणार आहेत. उद्याच्या आंदोलनातून सरकार धडा शिकले नाही तर १४ कामगार संघटना आणि गिरणी कामगार संयुक्त कृती लढा समितीने आंदोलनाचे पुढील पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आझाद मैदानावरील आंदोलन‌ हे न भूतो न भविष्यती ठरेल,असा विश्वास अनेक कामगार संघटना नेत्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.