“माझा राजकीय अस्तचा प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीसांच्या संपर्कात, उद्या रत्नागिरीतून…”, शिंदे गटातील बड्या नेत्याचे विधान
"सलग तिसऱ्यांदा एकनाथ शिंदे साहेबांमुळे मी उद्यागमंत्री झालो. मला दाओसला जाता आलं. गेल्या दोन वर्षात आम्ही सुमारे ७ लाख कोटी रुपयांचे MOu करण्यात यशस्वी झालो."

Uday Samant Big Announcement : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे दावोस येथे गुंतवणूक आणायला गेले नसून, आमदार फोडाफोडी करण्यासाठी गेले आहेत, ते तिथे बसून एकनाथ शिंदे यांचे आमदार फोडत असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊतांच्या या दाव्यानंतर सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. आता उदय सामंत यांनी यावरुन संजय राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊत यांना नियती धडा शिकवले. त्यांनी राजकारणासाठी माझा बळी देण्याचा प्रयत्न केला, अशा शब्दात उदय सामंत यांनी टीका केली आहे.
“सलग तिसऱ्यांदा एकनाथ शिंदे साहेबांमुळे मी उद्यागमंत्री झालो. मला दाओसला जाता आलं. गेल्या दोन वर्षात आम्ही सुमारे ७ लाख कोटी रुपयांचे MOu करण्यात यशस्वी झालो. आज तीच प्रथा आम्ही कायम ठेवली. सुमारे १५ लाख ७० हजार कोटींचे MOU आम्ही महाराष्ट्रासाठी केले आहेत. मी उद्योगमंत्री म्हणून समाधानी आहे. काही लोकांनी विचारलं की मागच्या वर्षीच्या mou चं काय झालं? मी नसताना काय काय ते बोलले आहेत. त्यांची निष्ठा किती आहे हे महाराष्ट्राला ४ वाजताच पत्रकार परिषदेत सांगतो”, असे उदय सामंत म्हणाले.
“माझा राजकीय अस्त व्हावा यासाठी प्रयत्न”
“शाळेत आपण जसे भांडायचो, तसे काही राजकीय नेते झाले आहेत. त्यावर मी संध्याकाळी सविस्तर बोलणार आहे. बाळासाहेबांच्या बाबतीत चांगली भूमिका जे कोणी मांडतील, त्यांचं समर्थन आम्ही करणार आहोत. ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, ते माझ्या नावाचा वापर करत आहेत, हे माझं मोठेपण आहे. असल्या बालिश पद्धतीने माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोणीही फूट पाडू शकत नाहीत. मी दावोसला असताना ज्या लोकांनी माझ्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले, माझा राजकीय अस्त व्हावा यासाठी प्रयत्न केले त्यांच्या बाबत मी एवढेच सांगू इच्छितो की ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहे. वारंवार त्यांना कॉल करत आहेत. काल सुद्धा त्यांचा कॉल आला होता आणि आमचा आता पुढे राजकीय भवितव्य काय असेल, असेदेखील त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं”, असा दावाही उदय सामंत यांनी केला.
“…त्यांनी राजकारणासाठी माझा बळी देण्याचा प्रयत्न केला”
“उद्यापासून उद्धव ठाकरे गटाला खिंडार पाडायला रत्नागिरीतून सुरुवात होत आहे. संजय राऊतांनी जे काही आरोप केलेत, त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात उद्या रत्नागिरीतून प्रत्युत्तर देऊन करणार आहे. उबाठाचे आजी माजी आमदार पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हा त्यांच्यासाठी धक्का असेल. संजय राऊत यांना नियती धडा शिकवेल. त्यांनी राजकारणासाठी माझा बळी देण्याचा प्रयत्न केला”, असेही उदय सामंत म्हणाले.