कुटुंब वारीला निघालं, डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीवर अत्याचार; पुण्यात नेमकं काय घडलं?

पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे वारीला निघालेल्या एका कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे.

कुटुंब वारीला निघालं, डोळ्यात मिरचीची पूड टाकून मुलीवर अत्याचार; पुण्यात नेमकं काय घडलं?
minor girl rape
| Updated on: Jul 01, 2025 | 7:06 PM

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी,पुणे : राज्यात रोज कोणत्या ना कोणत्या भागात महिला अत्याचाराची घटना घडत आहे. काही ठिकाणी पतीनेच आपल्या पत्नीवर अन्वनित अत्याचार केल्याचे प्रकरण समोर येते. तर कधी एखाद्या विद्यार्थिनीवरच अत्याचार केल्याचा प्रकार समोर येतो. बीड जिल्ह्यामध्ये तर एका खासगी कोचिंग क्लासमध्ये दोन शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र संतापलेला असताना जुन्नरमध्येही अशीच एक घटना घडली आहे.  पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या एका कुटंबीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून हे कुकृत्य करण्यात आलंय.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याचा धाक दाखवून अत्याचार करण्यात आला आहे. पुणे-सोलापूर रोडवर पालखी मार्गावर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवाय वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

चहा पिण्यासाठी थांबले, डोळ्यात मिरचीची पूड टाकली

पीडित अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय वारीसाठी निघाले होते. पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पंढरपूरला देवर्शनासाठी निघालेले असताना ते चहा पिण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात ते कुटुंब पहाटेच्या सुमाराच्या पिण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी दोन तरुण मोटरसायकलवर आले. त्यांनी या कुटुंबाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून कोयत्याचा धाक दाखवला आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या घटनेतील आरोपी अद्यापही फरार आहेत

आरोपींचा शोध घेतला जातोय

या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय. दौंड पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. या घटनेनंतर मोठ्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

यापूर्वीही पुण्यात वारकरी महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या एका महिलांच्या टोळीला अटक केली होती. या धक्कादायक घटनेनंतर पुणे पोलिसांकडून आरोपींचे स्केचेस जारी करण्यात आले आहेत. या आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची एकूण पाच पथकं रवाना करण्यात आली आहेत.