देवाभाऊंचे आडनाव फडणवीस ऐवजी देशमुख, पाटील असतं तर… सदाभाऊ खोतांच्या विधानाने चर्चांना उधाण
आमदार सदाभाऊ खोत यांनी नुकत्याच झालेल्या एका सत्कार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करत आपल्या राजकीय यशाबद्दल भाष्य केले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की फडणवीस हे आडनाव नसते तर त्यांना राजकारणात यश मिळाले नसते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आडनावामुळेच मी आमदार होऊ शकलो. यामुळेच मला राजकारणात यश मिळाले, असे विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या कामेरी येथील एका सत्कार समारंभात राजकारण आणि सामाजिक वास्तवावर भाष्य केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करत स्वत:च्या आमदारकीवर भाष्य केले. फडणवीस यांचे आडनाव फडणवीस होते म्हणूनच मी आमदार होऊ शकलो, जर त्यांचे आडनाव देशमुख किंवा पाटील असते तर कदाचित सदाभाऊ खोत आमदार झाला नसता, असे परखड विधान सदाभाऊ खोत यांनी मांडले.
सदाभाऊ खोत हे कायमच विविध मुद्द्यांवर भाष्य करत असतात. यावेळी त्यांनी राजकारणात आधार किती महत्त्वाचा असतो, याबद्दल मोठे विधान केले. “मी राजकारणात अपघाताने आणि अपवादाने आलो. कधीकधी अपघात होतो, हे आपल्याला माहिती नसतं. तसं मी राजकारणात अपघाताने आलो. राजकारणात पाय रोवण्यासाठी एका राजकीय वारसदाराची किंवा मार्गदर्शकाची गरज असते. कोणाचे तरी बोट धरून चालावे लागते आणि तो आधार आपल्याला देवाभाऊ यांच्या नावाने मिळाला”, असे सदाभाऊ खोत म्हणाले.
तर सदाभाऊ कधीही आमदार झाला नसता
“राजकारणात कोणाच्या तरी बोटाला धरुन चालावं लागतं आणि ते बोट, तो आधार देवाभाऊच्या नावाने या सदाभाऊ खोतला मिळाला. म्हणूनच सदाभाऊ खोत मंत्री आणि आमदार होऊ शकला. त्यामुळे मला नेहमी वाटतं की देवेंद्र फडणवीस हे नाव माझ्या दृष्टीने सावलीसारखं आहे. त्यांचं आडनाव फडणवीसच्या ऐवजी जर देशमुख, पाटील असतं तर सदाभाऊ कधीही आमदार झाला नसता. ते आडनाव फडणवीस होतं म्हणूनच सदाभाऊ या राज्यात आमदार होऊ शकला. ही वस्तूस्थिती आहे”, असे विधान सदाभाऊ खोत यांनी केले.
राजकीय वर्तुळात चर्चा
याच कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीवरही प्रकाश टाकला. “या व्यासपीठावरील सर्व माणसं, सर्वांचा नांगर आम्ही बदलावा, कोणाचं रान सदाभाऊंनी नांगरायचं ठेवलं असं अजिबात नाही,” असे खोत यांनी सांगितले. सध्या सदाभाऊ खोत यांच्या या विधानांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
