
NCP Merger : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राष्ट्रवादी पक्षात घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आता अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाची चर्चा रंगली आहे. येत्या 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची घोषणा केली जाणार होती, असे शरद पवार यांच्या पक्षातील नेते सांगत आहेत. अजितदादांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. दुसरीकडे अजितदादा आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावर चर्चा चालू असती तर अजितदादांनी त्याची कल्पना आम्हाला दिली असती, असे म्हणत शरद पवार यांचा दावा फेटाळला आहे. असे असतानाच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मावळ मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन सर्व आमदारांची भूमिका सांगितली आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर आता पुढे काय होणार? असे विचारले जात आहे.
सुनेत्रा पवार 10 ते 12 दिवसांनी प्रसारमाध्यमांना बोलून त्यांची भूमिका स्पष्ट करतील. सूनेत्रा पवार जी भूमिका घेतील, तीच भूमिका योग्य असेल. अजितदादा गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण करायचे, कोणाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद द्यायचे याचा सर्वस्वी अधिकार सूनेत्रा पवार यांनाच आहेत, असे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले. तसेच देवगिरी बंगल्यावर प्रत्येक मंगळवारी पक्षाची बैठक व्हायची. मी प्रत्येक बैठकीला असायचो. अजितदादांनी आमच्याशी पक्षाच्या विलीनीकरणाबाबत कधीच चर्चा केली नव्हती, असेही शेळके म्हणाले.
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाला मिळणार? याबाबतही अनेक प्रश्न विचारले जात आहे. यावर बोलताना काही मंडळी जाणीवपूर्वक याबाबतची घडवून आणत आहेत. सूनेत्रा पवार या आमच्या उत्तराधिकारी आहेत. त्या जो निर्णय घेतील तो राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाला, सामान्य कार्यकर्त्याला, पक्षातील जबाबदार व्यक्तीला अशा सर्वांनाच मान्य असेल, असे त्यांनी सांगितले.