मोठी बातमी! मनसेच्या हिंदीविरोधातील मोर्चाची तारीख बदलली, नवी तारीख काय?

मनसेने आपल्या मोर्चाची तारीख आता बदलली आहे. हा मोर्चा अगोदर 6 जुलै रोजी होणार होता. या मोर्चाची नवी तारीख आता आली आहे.

मोठी बातमी! मनसेच्या हिंदीविरोधातील मोर्चाची तारीख बदलली, नवी तारीख काय?
mns protest
| Updated on: Jun 26, 2025 | 5:31 PM

MNS Protest : इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा विषय शिकवण्याच्या राज्य सरकारच्या हट्टाच्या भूमिकेविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तर हिंदी भाषा विषयाच्या सक्तीला टोकाचा विरोध केला आहे. काहीही झालं तरी आम्ही हिंदी सक्ती लागू होऊ देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतले आहे. सरकारच्या हिंदी सक्तीच्या धोरणाला विरोध करण्यासाठी मनसेने येत्या 6 जुलै रोजी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले होते. आता मात्र या मोर्चाची तारीख बदलल्याची माहिती समोर आली आहे.

राज ठाकरे यांनीच केली होती मोर्चाची घोषणा

मिळालेल्या माहितीनुसार मनसेचा हा मोर्चा आता 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी होईल. मनसेने आपल्या मोर्चाची तारीख आता बदलली आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अगोदर 6 जुलै रोजीच्या मोर्चाची माहिती दिली होती. तसेच या मोर्चात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली होती. आता मात्र मनसेचे मोर्चाची तारीक 6 ऐवजी पाच जुलै केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे या मोर्चात मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींनाही सहभागी होण्याचे आवाहन करणार आहेत. राज ठाकरे यांनी इतर पक्षाच्या नेत्यांनाही या मोर्चात सहभागी व्हावे, अशी मागणी केली आहे.

मोर्चाची तारीख का बदलली?

मनसेने अगोदर 6 जुलै रोजी मुंबईत मोर्चा आयोजित केला जाईल, अशी घोषणा केली होती. मात्र 6 जुलै रोजी आषाढी-एकादशी आहे. त्यामुळे हा उत्सव लक्षात घेता मनसेने आपल्या मोर्चाची तारीख बदलली आहे. आषाढी एकादशीमुळे मनसेचा मोर्चा 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.

मनसेचा उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव

मिळालेल्या माहितीनुसार मनसेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाही मोर्चात सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला आहे. वेगवेगळे मोर्चे निघायला नको. एकच मोर्चा हवा, अशी भूमिका मनसेनं घेतल्याचं समजत आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी हा प्रस्ताव दिलाय. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हा प्रस्ताव मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोणत्याही राजकीय अजेंड्याविना होणार मोर्चा

दरम्यान, हा मोर्चा कोणत्याही अजेंड्याविना असेल. कोणत्याही पक्षाचा झेंडा या मोर्चात नसेल, असे राज ठाकरे यांनी अगोदरच सांगितले आहे. त्यामुळे या मोर्चात नेमकं कोण-कोण सहभागी होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.