सावरकरांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना… राज ठाकरेंची डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट
स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. सावरकरांच्या विचारांचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणाऱ्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत, असा सवाल करत त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या भोंदूगिरी आणि जातीपातीच्या राजकारणावर तीव्र संताप व्यक्त केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राजकारण्यांसह सर्वसामान्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी पोस्ट शेअर केली आहे. राज ठाकरे यांनी या पोस्टद्वारे सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर तीव्र शब्दांत टीका केली. तसे विरोधक आणि सत्ताधारी दोघांचाही खरपूस समाचार घेतला आहे. सावरकरांचा उदोउदो करून स्वतःच्या राजकारणासाठी त्यांचा वापर करणाऱ्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत? असा सवाल राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरे यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी राज ठाकरेंनी भोंदू बाबा, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, विज्ञान, तर्क, जात-धर्म यावरुन टीका केली आहे.
राज ठाकरेंची संपूर्ण पोस्ट
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते, आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत किंवा झेपले नाहीत. आणि सध्या सावरकरांचा उदोउदो करून त्यातून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी तरी सावरकर वाचले असतील का? त्यांना समजले असतील का याची शंकाच आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीला पटते का हे पाहणारे सावरकर खरंच यांना झेपत असतील का ?
सावरकरांना कधीच एका व्यक्तीचा उदोउदो करणं मान्य नव्हतं. कुठलीही गोष्ट तर्क आणि विज्ञानाच्या कसोट्यांवर थोडक्यात सत्य असत्य स्वतः तपासून बघितलं पाहिजे असं त्यांचं ठाम मत होतं.
हे सगळं सांगण्याचं कारण इतकंच ज्या भूमीत सावरकर जन्माला आले त्या महाराष्ट्रात व्हाट्सअप विद्यापीठात काय आलंय ते चूक बरोबर काही न तपासता किंवा साधा विचार पण न करता खरं मानण्याची चढाओढ लागली आहे. याच महाराष्ट्रात राजकारणी भोंदू बाबांच्या भजनी लागल्याचं दिसत आहे. आणि आपण कोण होतो, आपली महाराष्ट्राची परंपरा किती उज्वल होती हे न बघता उत्सव, डीजे याच्यात आपल्याला गुंतवून ठेवलं जात आहे. सावरकर हे प्रखर हिंदू धर्मभिमानी होते पण म्हणून धर्मातील त्रुटींवर टीका करताना त्यांनी कधी मागेपुढे पाहिलं नाही. पण आज सावरकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या प्रतिमा वापरून फक्त धर्मात तेढ पसरवणं सुरु आहे. जिथे त्यांनी जाती अंताचा लढा दिला त्या महाराष्ट्रात जातींवरून डोकी फोडणं सुरु आहे. आणि याला खतपाणी सत्ताधारी घालत आहेत.
उठता बसता सावकरकरांचा तिरस्कार करणाऱ्यांना सोडून द्या. पण जे त्यांचा वापर स्वतःच्या राजकारणासाठी करत आहेत त्यांना नक्की कुठले सावरकर कळलेत आणि त्यांचे कुठले विचार राजकीय आचरणात आणण्याची तयारी आहे? मी गेल्या २ महिन्यांत दोन वेळेस भाषणांमधून महाराष्ट्र विचारांनी आणि कल्पनांनी किती संपन्न आणि पुढारलेला होता हे सादरीकरण करून सांगतोय. याचं कारण आपण कोण होतो हेच आपण विसरलो तर पुढे कुठे जायचं याचा मार्ग आखणार तरी कसे आहोत ? आणि यासाठी जर आपण सत्तेला आसुलेले राजकारणी आणि व्हाट्सअप विद्यापीठातील खोटी नरेटिव्ह यावर अवलंबून राहणार असू तर महाराष्ट्राचं कठीण आहे.
आपण कोण होतो आणि आपल्या परंपरेतलं जे उत्तम आहे ते घेणं, प्रत्येक गोष्टीला तर्कावर तपासून बघणं हे करणं म्हणजेच सावरकरांना खरी श्रद्धांजली. अन्यथा तो उपचार ठरेल. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन !, असे राज ठाकरे म्हणाले.
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. सावरकर हे हिंदू राष्ट्रवाद मांडणारे तत्वज्ञ होते, क्रियाशील धर्मसुधारक, समाजसुधारक होते, आणि तितकेच विज्ञाननिष्ठ पण होते. सावरकर हे माझ्या मते देशातील एक असे महापुरुष आहेत, की त्यांच्या टीकाकारांना पूर्ण सावरकर कधी कळले नाहीत… pic.twitter.com/6kmRO5jthI
— Raj Thackeray (@RajThackeray) May 28, 2026
दरम्यान राज ठाकरे यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. सावरकरांच्या नावावर केवळ मतांचे राजकारण करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांना या निमित्ताने आरसा दाखवला आहे. राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर आता राजकीय नेते काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.