रात्र वैऱ्याची…, राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना मोठं आवाहन, नेमकं काय म्हणाले?

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मतदार याद्यांमध्ये सुरू असलेल्या घोळावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. रात्र वैऱ्याची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

रात्र वैऱ्याची..., राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्यांना मोठं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2025 | 9:34 PM

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांनंतर लगेचच महापालिका निवडणुका देखील होण्याची शक्यता आहे. दरम्यान विरोधकांकडून सातत्यानं निवडणूक याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. आज पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताध्याऱ्यांवर याच मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुंबईमध्ये आयोजित कोकण महोत्सवात बोलत होते. रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, मतदार याद्यांमध्ये जे काही सुरू आहे, त्यावर लक्ष ठेवा असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे? 

थोडे दिवस थांबा भाषणं सुरूच होतील, 11 वर्ष हा कोकण महोत्सव साजरा होत आहे. मला फक्त जाता जाता एवढीच गोष्ट सांगायची आहे. रात्र वैऱ्याची आहे,  गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे. मतदार याद्यांमध्ये जे काही सुरू आहे,  त्याकडे लक्ष ठेवा. मतदार खरे आहेत की खोटे आहेत? याच्यावरती पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर महापालिका  हातातून गेलीच समजा. त्यामुळे गाफील राहू नका, एवढंच सांगायचं आहे, मुंबई जर आपल्या हातातून गेली तर हे लोक थैमान घालतील, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसे, शिवसेना ठाकरे गट युती 

दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युती होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात देखील दोन्ही पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसने मनसेसोबत युती करण्यास नकार दिला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहेत.