एका बापाची अवलाद असेल तर 4 तारखेला… MNSचं खुलं आवाहन, रिक्षाचालकाच्या संपामुळे टेन्शन वाढलं

राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणे बंधनकारक असल्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला. 1 मेपासून कडक अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. आता या विरोधात 4 तारखेला अमराठी रिक्षा चालक संपावर जाणार आहेत.

एका बापाची अवलाद असेल तर 4 तारखेला... MNSचं खुलं आवाहन, रिक्षाचालकाच्या संपामुळे टेन्शन वाढलं
अविनाश जाधव
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 24, 2026 | 3:55 PM

गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांचा संप आणि मराठी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे मनसे अधिकच आक्रमक झाली आहे. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सदावर्ते आणि संपाचा इशारा देणाऱ्या अमराठी रिक्षाचालकांना अत्यंत कडक शब्दांत तंबी दिली आहे.

सदावर्ते हा एक ‘टुकार’ माणूस!

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्लाबोल करताना अविनाश जाधव म्हणाले की, “सदावर्ते हा एक टुकार माणूस आहे, जो केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी नाक खुपसतो. तो सतत मराठी भाषा आणि मराठी नेत्यांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतो. काल त्याने मीरा-भाईंदरमध्ये येऊन अशाच प्रकारचे वक्तव्य करण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या मनसैनिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला.”

गृहमंत्रालयाला विनंती आणि इशारा

अविनाश जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले की, “सदावर्तेला मिळालेल्या संरक्षणामुळे तो जोरजोरात बोलून स्वत:चे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो. काल तो ज्या पद्धतीने बडबडत होता, ते पाहून तो दारू पिऊन बोलत होता की काय, असे वाटत होते. प्रशासनाने वेळीच त्याला आवर घातली नाही, तर आमचा संयम सुटेल. एक दिवस असा येईल की सदावर्तेला रस्त्यावर कपड्यांशिवाय फिरवले जाईल. जर गृह खाते त्याला समज देत नसेल, तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि त्याला लाथा-बुक्क्यांची भाषा समजावून सांगू.”

रिक्षाचालकांच्या आकड्यांचा पोलखोल

संपावर जाणाऱ्या १५ लाख रिक्षाचालकांच्या दाव्यावर बोलताना जाधव यांनी अधिकृत आकडेवारीच समोर ठेवली. ते म्हणाले, आरटीओकडून घेतलेल्या अधिकृत माहितीनुसार, एमएमआर (MMR) रिजनमध्ये केवळ ४ लाख १० हजार रिक्षा आहेत. मग हा १५ लाखांचा आकडा आला कुठून? यातील ६५% रिक्षाचालक हे मराठी आहेत. मुंबई आणि ठाण्याचा काही भाग सोडला तर सर्व ठिकाणी मराठीच रिक्षाचालक आहेत. जे ‘भैये’ रिक्षा चालवतात, त्यातील बहुतांश परमिट्स ही मराठी माणसांची आहेत.

४ तारखेला प्रवाशांना त्रास दिला तर गाठ मनसेशी!

४ तारखेला रिक्षाचालकांनी पुकारलेल्या संपावर भाष्य करताना अविनाश जाधव यांनी थेट आव्हान दिले. “तो जर एका बापाची अवलाद असेल, तर त्यांनी ४ तारखेला मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं. आम्ही खात्री देतो की ४ तारखेला महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला त्रास होणार नाही. वेळ आली तर आम्ही आमच्या गाड्या काढू आणि प्रवाशांना घरपोच पोहोचवू. पण त्यानंतर जर कोणी रस्त्यावर रिक्षा उतरवल्या, तर त्यांना थेट युपीलाच पाठवणार,” असा सज्जड दम त्यांनी भरला.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

सदावर्ते यांच्या विरोधात मनसेकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी अविनाश जाधव यांनी केली आहे. जर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर मनसे स्वतःच्या स्टाईलने सदावर्तेला ‘धोपटल्याशिवाय’ राहणार नाही, असा इशाराही त्यांनी शेवटी दिला.

Follow Us