
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आजही सुरूच आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस असून, जरांगे पाटील यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आजपासून ते पाणी न पिता आंदोलन करणार आहेत. आजपासून ते अन्न आणि पाणी दोन्हीचा त्याग करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढली असून, सरकारवर दबाव वाढला आहे. आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला विरोधकांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. त्यातच आता मनसेने मराठा आंदोलनावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
मनसे नेते अमित ठाकरे यांनी नुकतंच त्यांच्या फेसबुकवर एक प्रसिद्धी पत्रक शेअर केले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. तर दुसरीकडे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना मराठा बांधवांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत आलेल्या मराठ्यांना कशाची कमी पडू देऊ नका, त्यांना एकटा आहे हे वाटू देऊ नका. त्यासाठी मनसेकडून हवी ती मदत करा, असं आवाहन अमित ठाकरे यांनी मनसैनिकांना केले आहे.
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो,
सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत.
हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत.
ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे.
माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे,
– जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा.
– औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका.
– त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या.
– एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे.लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत.
आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे. जय महाराष्ट्र!
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावरुन टीका केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा विषय सोडवला होता, मग ते परत का आले, असा सवाल राज ठाकरेंनी केला होता. त्यावर मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर देताना राज ठाकरेंना टोला लगावला होता. राज ठाकरे म्हणजे मानाला भुकलेलं पोरगं. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी मग पक्ष बरबाद झाला तरी चालतं. हुरळून जातात. कुचक्या कानाचं म्हणतात. तुम्ही नाशिकला गेला. आम्ही विचारलं का. पुण्याला गेला आम्ही विचारलं का. तुम्ही संभाजीनगरला येता आम्ही विचारलं का? असा सवाल मनोज जरांगेंनी केला होता.