
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विविध वर्गांना आकर्षित करण्यासाठी अनेक अनुदानं तसंच मोफत योजना घोषित करण्यात आल्या आहेत. यात मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण योजना’ राबविण्यात येणार आहे. मध्य प्रदेशात भाजपला या योजनेमुळे, विधानसभा तसंच लोकसभा निवडणुकीत मिळालेलं यश बघून, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेलं नुकसान भरून काढण्याच्या हेतूने ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील महिला आणि मुलींचं आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करण्यासाठी ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजना 1 जुलैपासून लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहेत. सुमारे एक कोटी महिलांना याचा लाभ होणार असून जुलैपासून या योजनेची अंमलबजाणी केली जाणार आहे. त्यासाठी सरकारवर वर्षाला 46 हजार कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. 1 जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. योजनेचं स्वरुप प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण...