असा विचार करू नका की, आपला विजय निश्चित आहे…; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

BJP Leader Devendra Fadnavis on Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाचं विधान केलं आहे. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? वाचा...

असा विचार करू नका की, आपला विजय निश्चित आहे...; देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Dec 31, 2023 | 4:01 PM

मुंबई | 31 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात सर्वच पक्ष तयारीला लागलेत. युती आणि आघाडीकडून निवडणूक जिंकण्याचा दावा केला जात आहे. पुढच्या निवडणुकीत देखील युतीचाच विजय होईल, असा दावा महायुतीचे नेते करत आहेत. 2024 ला देखील देशातील जनता नरेंद्र मोदी यांच्याच कामाला मतदान करेन, असा दावा युतीकडून केला जात आहे. असं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलंय.

फडणवीस काय म्हणाले?

पुढच्या वर्षी होणाऱ्या निवडणुकीला हलक्यात घेऊ नका. तर गांभीर्यपूर्वक या निवडणुकीकडे पाहा आणि कामाला लागा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. असा विचार करू नका की आपला विजय निश्चित आहे… ही निवडणूक आहे आणि याकडे निवडणुकीसारखं पाहा. पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मेहनत घ्या, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

कार्यकर्त्यांना काय आवाहन?

मोदी सरकारच्या योजनांचा सर्वाधिक फायदा गरीब, शेतकरी, महिला आणि युवकांना सर्वाधिक फायदा झाला आहे. भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. या घटकांवर लक्ष केंद्रीत करा, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या आहेत. तसंच राज्यात सध्या धर्म आणि जातीच्या मुद्द्यावरून राजकारण केलं जात आहे. पण आपण जातीचं राजकारण करायचं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांना बजावलं.

लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. शिवाय त्यापाठोपाठ विधानसभेचीही निवडणूक होणार आहे. अशातच भाजपने मोठा निर्णय घेतलाय. स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांचं भाषण लोकांना प्रभावित करत त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वाचा लोकांवर प्रभाव पडेल, यामुळे भाजपने रॅली करण्याचं ठरवलं आहे. 36 जिल्ह्यांमध्ये देवेंद्र फडणवीस रॅली करणार असल्याची माहिती आहे. या आठवड्यात झालेल्या भाजपच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती आहे.