मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग; 7 धरणांत किती टक्के पाणीसाठा? वाचा संपूर्ण माहिती
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सलग तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सातही धरणांची पाणीपातळी वाढली आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा दिला आहे. 7 पैकी 5 धरण क्षेत्रात इतर धरणांच्या तुलनेने कमी पाऊस पडत आहे. पण तरीही या सात धरणातील पाणीसाठा वाढू लागला […]

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सलग तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सातही धरणांची पाणीपातळी वाढली आहे. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा दिला आहे. 7 पैकी 5 धरण क्षेत्रात इतर धरणांच्या तुलनेने कमी पाऊस पडत आहे. पण तरीही या सात धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे. त्यानंतरही नागरिकांची पाणी टंचाईची चिंता कायम असणार आहे.
मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुलसी या सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांत गुरुवारपर्यंत 8.12 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे यंदा पाणीसाठ्यात घट झाली होती. राज्यात संपूर्ण जून महिना कोरडा गेला. तर काही ठिकाणीच पावसाने हजेरी लावली होती.
जून महिन्यात कमी पाऊस पडल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये वेगाने पाणीसाठा कमी झाला होता. काही दिवसांपूर्वी पाणीसाठा हा 6.75 टक्क्यांवर पोहोचला होता. तर 30 जूनपासून सुरू झालेल्या पावसाने मुंबईकरांना दिलासा दिलाय. त्यामुळे गुरुवारी रात्री पाणीसाठा 8.12 टक्के इतका झाला.
पाणीसाठा कमी असल्याने पालिकेने इतर नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत 15 मे 2026 पासून 10 टक्के पाणीकपात लागू आहे. पिण्याचे पाण्याची बच करण्यासाठी वापरण्याच्या पाण्यावर मर्यादा आखल्या आहेत. औद्योगिक, व्यापारी, स्पोर्ट्स क्लबला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात 20 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. आता पुढील काही दिवसांत धरणक्षेत्रात जास्त पाऊस पडला नाही, तर येत्या दिवसांत पाणी कपात वाढवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो.
खडकवासला धरणसाखळीत १० वर्षांतील ५ व्या क्रमांकाचा नीचांकी साठा
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांमध्ये १ जुलैअखेर एकूण उपयुक्त पाणीसाठा सुमारे ३.७७टीएमसी शिल्लक आहे. मागील १० वर्षांच्या तुलनेत हा पाचव्या क्रमांकाचा सर्वांत कमी पाणीसाठा ठरलाय. यापेक्षा कमी साठा केवळ २०१६, २०२२, २०१९ आणि २०१८ मध्ये नोंदविण्यात आला होता. त्यामुळे जून महिन्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्याने यावर्षीही पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शहरासमोर पाणीकपातीची टांगती तलवार कायम आहे.
पावसानंतरही पुणे जिल्ह्यात पाणीटंचाई
मान्सून सक्रिय होऊनही पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणीटंचाई कायम आहे. जिल्हा प्रशासनाच्या १५१ टँकरद्वारे २५७ गावे आणि ६३२ वाड्यावस्त्यांतील २ लाख ५८ हजार नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. पुरंदर, जुन्नर आणि खेड तालुक्यांत सर्वाधिक टँकर सुरू आहे. त्यामुळे भूजलपातळी न वाढल्याने टँकरवरील अवलंबित्व अद्याप कायम असल्याची माहिती प्रशासनाने दिली.