मोठी बातमी! श्वासही घेता येईना, डोळ्यांची जळजळ… अंधेरी एमआयडीसीतील गॅस गळतीने घेतला एकाचा बळी; नागरिक हादरले

Gas Leakage : मुंबईतील अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील भांगरवाडी येथे रासायनिक गॅस गळती झाली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले

मोठी बातमी! श्वासही घेता येईना, डोळ्यांची जळजळ... अंधेरी एमआयडीसीतील गॅस गळतीने घेतला एकाचा बळी; नागरिक हादरले
Gas Lekage in Andheri (प्रतिकात्मक फोटो)
| Updated on: Nov 22, 2025 | 8:39 PM

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. अंधेरीच्या एमआयडीसी परिसरातील भांगरवाडी येथे रासायनिक गॅस गळती झाली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. एका तीन मजली इमारतीत संध्याकाळी अचानक रासायनिक गळती झाल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. भांगरवाडी येथे ही घटना घडली आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरु आहेत.

अंधेरी पूर्वेतील भांगरवाडी परिसरातील घटना

समोर आलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्वेतील भांगरवाडी येथील एमआयडीसी पोलिस ठाण्याजवळील एका तीन मजली इमारतीत संध्याकाळी अचानक रासायनिक गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. या गॅस गळतीमुळे बाधित झालेल्या 3 लोकांनी गुदमरल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यानंतर एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. आता अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.

गॅस गळतीचे कारण अस्पष्ट

अंधेरीतील ही गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. अग्निशमन दलाचे पथक आणि प्रशासनाचे अधिकारी या गॅस गळतीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या गॅसगळतीमुळे आणखी कोणी जखमी झाले आहे का? याचाही शोध घेतला जात आहे. अनेकदा गॅस गळतीमुळे आग लागण्याचा धोका असतो मात्र आगीची कोणतीही घटना घडली नसल्याची माहिती समोर आली आहे.

एकाचा मृत्यू, दोघांवर उपचार सुरू

दरम्यान, अधेरी परिसरात याआधीही गॅस गळती झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेकदा या गॅस गळतीमुळे आग लागते ज्यामुळे मोठे नुकसान होते. मात्र आज घडलेल्या घटनेत असा कोणताही प्रकार घटलेला नाही. ज्या इमारतीत गॅस गळती झाली तेथील 3 नागरिकांनी श्वास गुदमरल्याची आणि डोळे जळजळ करत असल्याची तक्रार केली होती. या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र यातील एकाचा मृत्यू झाला आहे. इतर दोन जखमींवर उपचार सुरु आहेत.

पोलीसांनी काय म्हटले?

आज दुपारी 2.0 वाजता सईदा हुसेन यांच्या घरी मुलगा अहमद सईदा हुसेन यांनी जुन्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी पाण्यात सोडियम सल्फाइड मिसळले, ज्यामुळे धुराची निर्मिती झाली. या धुरामुळे तो बेशुद्ध झाला. इतर दोन व्यक्ती त्याला वाचवण्यासाठी धावल्या, धुर नाकातोंडात गेला आणि ते देखील बेशुद्ध पडले. या घटनेत अहमद सईदा हुसेन यांचा मृत्यू झाला आहे तर सईदा हुसेन आणि नौशाद अन्सारी हे जखमी झाले आहे. जखमींवर महाकाली केव्हज रोड येथील होली स्पिरिट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.