रस्ते खाली करा…तत्काळ इथून निघा… पोलिसांचा आदेश, दुसरीकडे मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, वाचा मुंबईच्या मैदानातील A टू Z घडामोड

मुंबईचे रस्ते पदपथ खाली करा असा आदेश न्यायालयाने दिल्यानंतर आता मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. मराठा आंदोलकांनी आपली वाहने मुंबईबाहेर नेऊन लावावीत तसेच मुंबईचा परिसर खाली करा, असे सांगितले जात आहे.

रस्ते खाली करा...तत्काळ इथून निघा... पोलिसांचा आदेश, दुसरीकडे मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, वाचा मुंबईच्या मैदानातील A टू Z घडामोड
manoj jarange patil and maratha protest
| Updated on: Sep 02, 2025 | 3:32 PM

Maratha Reservation Mumbai Protest : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर हजारो मराठा आंदोलक जमा झाले आहेत. या आंदोलनालामुळे मुंबईचा दिनक्रम खोळंबला असून चाकरमान्यांचे हाल होत आहेत. काही आंदोलकांच्या हुल्लडबाजीचेही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यामुळचे मराठा आंदोलनासंदर्भात न्यायालयाने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. सरकारही लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. न्यायालयाने तीन वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते खाली करा, अन्यता आम्ही कठोर आदेश देऊ असा आदेशच न्यायालयाने दिला आहे. आता या आदेशानंतर मुंबईचे रस्ते रिकामे केले जात आहेत.

काही ठिकाणी विरोध, काही ठिकाणी सहकार्य

न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईचे रस्ते खाली करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत. मुंबई पोलिसांकडून लाऊट स्पीकरच्या मदतीने आंदोलकांना परिसर खाली करण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या गाड्या मुंबईच्या बाहेर न्याव्यात असेही सांगण्यात येत आहे. काही ठिकाणी पोलिसांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला जात आहे. तर काही ठिकाणी मात्र मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईचे रस्ते रिकामे करण्यास सुरुवात

काही आंदोलकांनी आम्हाला मुंबईच्या बाहेर काढण्याचा हा डाव आहे. आमचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप काही आंदोलकांकडून केला जातोय. कोर्टाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांनीदेखील मुंबईचे रस्ते मोकळे करा असा आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता. काही आंदोलक जरांगे यांच्या या आदेशाचा दाखला देत आम्ही हा परिसर रिकामा करायला तयार आहोत, अशी भूमिका घेताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पोलीसह एक-एक गाडी मुंबईच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

आम्ही सहकार्य करतो, तुम्हीही….

या सर्व प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आझाद मैदान, सीएसएमटी, बीएमसी परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलक आक्रमक होऊ नयेत यासाठी पोलिसांकडूनही फक्त आवाहन केले जात आहे. तुम्ही आम्हाला सहकार्य करा आम्ही तुम्हाला सहकार्य करू, असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

आम्ही आमच्या गाड्या मुंबईबाहेर नेतो, पण…

दरम्यान, काही आंदोलकांनी आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहोत. मात्र आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या लोकांना राहण्याची, टॉयलेटची सोय करा. त्यांच्या पाण्याची व्यवस्था करा, अशी मागणी काही आंदोलक करत आहेत. तसेच आम्ही आमच्या गाड्या मुंबईच्या बाहेर नवी मुंबईत घेऊन जायला तयार आहोत पण आझाद मैदानावर आंदोलन करत असलेल्या लोकांना अन्न-पाणी पुरवणाऱ्या गाड्यांना येथेच थांबू द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील घेणार जरांगेंची भेट

दरम्यान, या सर्व गोंधळादरम्यान मनोज जरांगे यांनी मुंबई पोलिसांची नोटीस नाकारली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.