दादांनी सांगितलंय आता…कोर्टाचा आदेश येताच मराठ्यांची नवी भूमिका काय? मुंबईच्या रस्त्यावर काय घडतंय?
मुंबईचे रस्ते तीन वाजेच्या आत मोकळे करावेत असा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर आता मुंबई पोलीस सक्रीय झाले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांना, आंदोलकांच्या गाड्यांना रस्त्यावरून हटवले जात असून आंदोलकांनी नवी मुंबईत जावे असे आवाहन केले जात आहे.

Manoj Jarange Patil Maratha Protest : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दक्षिण मुंबईच्या प्रत्येक रस्त्यांवर मराठा आंदोलक दिसत आहेत. सीएसएमटी, मरीन ड्राईव, मुंबई पालिका परिसर सामान्यांसाठी बंद करण्यात आला आहे. हीच बाब लक्षात घेऊन न्यायालयाने मोठा आदेश दिलाय. आज (2 सप्टेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबईचे रस्ते, पदपथ खाली झाले नाही तर आम्ही ठोस निर्णय घेऊ, असा इशारा न्यायालयाने दिलाय. आता न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा समाज सक्रिय झाला आहे. मराठा समाजाने काही नव्या मागण्या केल्या आहेत.
पोलिसांकडून केले जात आहे आवाहन
न्यायालयाच्या आदेशानंतर आता मुंबईचे रस्ते खाली खरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस मराठा आंदोलकांना आवाहन करत आहेत. आम्ही तुम्हाला आंदोलनासाठी सहकार्य करत आहोत, तुम्हीही आम्हाला सहकार्य करा असे मुंबई पोलीस सांगत आहेत. मुंबईच्या रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या गाड्या काढा, रस्ते मोकळे करा असा असे पोलीस सांगत आहेत. तर ज्या गाड्यांत जेवण आहे त्या इथेच ठेवू द्याव्यात अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे.
मराठा आंदोलकांची मागणी काय आहे?
न्यायालयाच्या आदेशानंतर मनोज जरांगे यांनीदेखील मुंबईचे रस्ते मोकळे करा असे आवाहन केले आहे. काही ठिकाणी मात्र मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही आंदोलकांनी सहकार्याची भूमिका दाखवत मुंबईचे रस्ते खाली करण्यास सुरुवात केली आहे. यातीलच एका आंदोलकाने माध्यमांशी संवाद साधत न्यायालय आणि प्रशासनाकडे काही मागण्या केल्या आहेत. आमची कोर्टाला विनंती आहे आम्हाला आझाद मैदान द्यावे, सीएसएमटीचा परिसर द्या किंवा आम्हाला वानखेडे स्टेडियम द्या. आमचा लढा हा लोकशाहीच्या मार्गाने चालू आहे. लोकांना त्रास द्यायचा आमचा उद्देश नाही. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण मराठा समाज हा नवी मुंबईत गेला आहे. जे लाखो मराठे होते ते सगळे आता नवी मुंबईत आहेत.
प्रशासनाला एवढीच विनंती आहे की…
न्यायालयाच्या आदेशानंतर आम्ही नवी मुंबईत गेलो आहोते. डीसीपी साहेब ज्या सूचना देतात त्यांचे आम्ही पालन करतो. ते जेव्हा-जेव्हा आम्हाला बोलवतात तेव्हा-तेव्हा आम्ही जातो. त्यांना सहकार्य करतो. म्हणूनच आमची सरकारला आणि प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आमच्या लोकांना रस्त्याच्या बाजूला जागा द्यावी. पाच हजार लोकांच्या गाड्या, जेवणाच्या गाड्यांच्या पार्किंगला जागा द्या. आंदोलकांना पाण्याची सुविधा करून द्यावी. टॉयलेट्सची व्यवस्था करू द्या. आमच्या जेवणाच्या गाड्या येत आहेत त्यांनाही जागा द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार? सरकार, मुंबई पोलीस काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
