बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं, पायधुनीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट.. FDA चा धक्कादायक खुलासा काय ?

मुंबईतील पायधुनी येथे एकाच कुटुंबातील चौघांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शहर हादरले आहे. बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर ही घटना घडल्याने कलिंगडातील भेसळीवर संशय होता. मात्र, एफडीएच्या तपासणीत मोठा खुलासा झाला आहे.

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं, पायधुनीत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट.. FDA चा धक्कादायक खुलासा काय ?
एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने हदरली मुंबई
| Updated on: May 02, 2026 | 9:19 AM

मुंबईतील पायधुनी येथे जी दुर्दैवी घटना घडली, त्याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात, 25 एप्रिल रोजी डोकाडिया कुटुंबाने रात्री साडेदहाच्या सुमारास बिर्याणी खाल्ली. त्यानंतर ते घरी आले. रात्री एकच्या सुमारास मुलांना पुन्हा भूक लागली. म्हणून त्यांनी कलिंगड कापून खाल्लं. मात्र पहाटेच्या सुमारास सर्वांनाच उलट्या, जुलाब होऊ लागले.त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूने अख्ख शहर हादरलं. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणावर चर्चा सुरू असून बिर्याणीवर कलिंगड खाल्ल्याने हा त्रास झाला का असाही सवाल उपस्थित होत होता. या संशयामुळे लोकांच्या मनात धास्ती बसली, ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे.

FDA चा मोठा खुलासा

एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. एफडीएच्या तपासणीत कलिंगडात कोणतीही भेसळ आढळलेली नाहीये. त्या कुटुंबाने खालेल्या कलिंगडात रंग, गोडवा तसेच त्याचा आकार वाढवण्यासाठी कोणताही कृत्रिम रंग अथवा रसायनांचा वापर झाला नसल्याचा मोठा महत्वाचा खुलासा FDA ने केला आहे.

त्यामुळे कलिंगडातील भेसळीमुळे डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू झाल्याची शक्यता मावळली आहे. एवढंच नव्हे तर डोकाडिया कुटुंबाच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या इतर खाद्य नमुन्यांमध्ये अद्याप कोणतीही भेसळ आढळली नाही, असंही FDA च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

पण मग त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला हा प्रश्न अद्यापही कायम असून चार जणांच्या या मृत्यूचं गूढ चांगलंच वाढलं आहे. त्यामुळे आता सगळं लक्ष हे फॉरेन्सिक अहवालासह बॅक्टेरियल चाचण्यांकडे असून त्याचा काय निकाल येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मृतांचे महत्त्वाचे अवयव हिरवट

याप्रकरणात फॉरेन्सिक चाचणीचा धक्कादायक अहवालही नुकताच समोर आला होता. फॉरेन्सिक अहवालानुसार, डोकाडिया कुटुंबातील मृतांचे महत्वाचे अवयव हिरवट पडल्याचे प्राथमिक चाचणीत समोर आलं होतं. मृतांचा मेंदू, हृदय आणि आतडी हिरवट पडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सामान्य अन्न विषबाधेपेक्षा ही स्थिती वेगळी असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केलं. विषबाधेची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली. असे बदल जेव्हा एकाच वेळी अनेक अवयवांमध्ये दिसतात, तेव्हा एखादा विषारी घटक शरीरात पसरतो, असे संकेत डॉक्टरांनी दिले. नवीन खुलास्यामुळे चौघांच्या मृत्यूला घेऊन संशय आणखीन बळावला.

 

Follow Us