मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

| Updated on: Jun 17, 2021 | 11:18 PM

पुढील 3 ते 4 तास मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगडमध्ये पुढील 3 ते 4 तास मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई पाऊस (प्रातिनिधिक फोटो)
Follow us on

मुंबई : राज्यात काही भागात पावसाने सकाळपासून जोरदार हजेरी लावलीय. मुंबई, मुंबई उपनगर आणि वसई-विरार परिसरातही सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. विवार पूर्वमधील काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी आता पुढील 3 ते 4 तास मुंबई, ठाणे, वसई-विरार, डहाणू आणि रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. यातील काही भागात सकाळपासून तब्बल 160 ते 180 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. आता पुढील 3 ते 4 तास मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय. (Mumbai, Thane, Vasai-Virar, Dahanu and Raigad forecast heavy rains for next 3 to 4 hours)

पंचगंगा पात्राबाहेर

गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी तीन फुटांवर गेली असून नदीचे पाणी पात्राबाहेर गेलं आहे. जिल्ह्यातील 53 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले असून काही मार्गावरील वाहतूकदेखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 17 फुटांनी वाढ झाल्याने, नदीतील मंदिरं आता पाण्याखाली गेली आहेत. शिवाय आजूबाजूच्या शेतातदेखील पाणी शिरायला सुरूवात झाली आहे. नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ

सांगली जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊ लागली आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी सध्या 15 फुटांवर गेली आहे. नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आव्हान केलं आहे. जिल्ह्यात असाच पाऊस राहिला तर नदीच्या पाणीपातळीत अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Heavy rains in Sangli district, water level of Krishna river at 15 feet)

एकीकडे सततच्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. तर दुसरीकडे शेरीनाल्याचं दूषित आणि फेसाळ पाणी कृष्णेच्या पात्रात मिसळत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कृष्णा नदीवर मोठा फेस दिसून येत आहे. त्यामुळे सांगलीकराच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दुर्गंधीयुक्त आणि फेसाळ पाणी कृष्णेच्या पात्रात सोडलं जात आहे. नदीच्या पाण्याचा वापर सांगलीकर पिण्यासाठीही वापरतात. मात्र नदीत दूषित पाणी मिसळत असताना महापालिका प्रशासनानं याकडे दुर्लक्ष असल्याचं पाहायला मिळत आहे.

विरारमध्ये पुराच्या पाण्यात म्हशी वाहून गेल्या

इकडे मुंबईजवळच्या विरारमध्ये पुराच्या पाण्यात 3 म्हशी वाहून गेल्या. विरार पूर्व फुलपाडा डॅमवरून चरण्यासाठी जाताना मोठ्या नाल्यात 3 म्हशी वाहून गेल्या. आज दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. म्हशी वाहून जातानाचा लाईव्ह व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 म्हशींना बाहेर काढलं. एका म्हशीचा मात्र शोध सुरु आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात असाच पावसाचा जोर कायम राहिला तर परिसरात हाहाकार माजण्याची शक्यता आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत सासुपाडा परिसरात मुख्य रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे मुंबई आणि गुजरात लेनवर जाणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली. वसई विरार परिसरात पावसाचा जोर सुरूच आहे. डोंगरावरून येणारे पाणी महामार्गावर आल्याने सासुपाडा परिसरात पाणी साचले आहे.

संबंधित बातम्या :

Weather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा  

Panchaganga River | कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर

Mumbai, Thane, Vasai-Virar, Dahanu and Raigad forecast heavy rains for next 3 to 4 hours