Maharashtra Rains : पंचगंगा पात्राबाहेर, कोकणात कोसळधार, ठाणे-विरारमध्ये धुवाँधार, राज्यात कुठे काय परिस्थिती?

राज्याभरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस कोसळत आहे. तळकोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे.

Maharashtra Rains : पंचगंगा पात्राबाहेर, कोकणात कोसळधार, ठाणे-विरारमध्ये धुवाँधार, राज्यात कुठे काय परिस्थिती?
Virar Rain
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Jun 17, 2021 | 6:34 PM

कोल्हापूर : राज्याभरात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात धुवाँधार पाऊस कोसळत आहे. तळकोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे. तर कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेर केली आहे. येत्या 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पुणे, साताऱ्यासह, रत्नागिरीला रेड ॲलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra and Mumbai rains update heavy rain slashes Kolhapur, Konkan, Panchaganga river overflow)

पंचगंगा पात्राबाहेर

गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी तीन फुटांवर गेली असून नदीचे पाणी पात्राबाहेर गेलं आहे. जिल्ह्यातील 53 हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले असून काही मार्गावरील वाहतूकदेखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 17 फुटांनी वाढ झाल्याने, नदीतील मंदिरं आता पाण्याखाली गेली आहेत. शिवाय आजूबाजूच्या शेतातदेखील पाणी शिरायला सुरूवात झाली आहे. नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Panchaganga river

Panchaganga river

पिंपरी चिंचवडमध्ये पाऊस

पिंपरी चिंचवड शहराच्या विविध भागात सायंकाळच्या सुमाराला पावसाने काही भागात दमदार हजेरी लावली. सकाळपासून शहरात थांबून थांबून पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. काहीकाळ उन्हही शहरात अनुभवायला मिळाले. पण सायंकाळी काही भागात पावसाने दमदार हजेरी लावली.

विरारमध्ये पुराच्या पाण्यात म्हशी वाहून गेल्या

इकडे मुंबईजवळच्या विरारमध्ये पुराच्या पाण्यात 3 म्हशी वाहून गेल्या. विरार पूर्व फुलपाडा डॅमवरून चरण्यासाठी जाताना मोठ्या नाल्यात 3 म्हशी वाहून गेल्या. आज दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. म्हशी वाहून जातानाचा लाईव्ह व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी 2 म्हशींना बाहेर काढलं. एका म्हशीचा मात्र शोध सुरु आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात असाच पावसाचा जोर कायम राहिला तर परिसरात हाहाकार माजण्याची शक्यता आहे.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत सासुपाडा परिसरात मुख्य रस्त्यावर पाणी साचले. त्यामुळे मुंबई आणि गुजरात लेनवर जाणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली. वसई विरार परिसरात पावसाचा जोर सुरूच आहे. डोंगरावरून येणारे पाणी महामार्गावर आल्याने सासुपाडा परिसरात पाणी साचले आहे.

रत्नागिरीत धुवाँधार

सकाळच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रत्नागिरी धुवाधार पावसाला सुरुवात झाली. गेल्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व तालुक्‍यांमध्ये अतिवृष्टी झालेली पहायला मिळाली. रात्रभर बरसल्यानंतर जिल्ह्यात सकाळी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दुपारनंतर पुन्हा एकदा जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

पुढील तीन दिवसांसाठी हवामान खात्याने कोकणाला अलर्ट दिलाय. मध्यरात्री कोसळणाऱ्या पावसानं नद्याच्या पाणी पातळीत वाढ झालीय. जगबुडी ६ मिटर, वाशिष्ठी ५ मिटर,कोदावली५ मिटरची पातळी आहे.गेल्या चौविस तासात ८३ मिलिमिटर पावसाची नोंद खेड १६५ मिलिमिटर,संगमेश्वर १०२ लांजा ८७ राजापूर ८५ तर चिपळूणाक ८४ मिलिमिटर पाऊस झालाय. ४५४ मिलिमिटरची सरासरी गाठलीय.

सिंधुदुर्गात मुसळधार

सिंधुदुर्गात गेले चार दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तीन धरणे तुडुंब भरून गेली आहेत. तर नऊ धरणांमध्ये पन्नास टक्क्याहून जास्त पाण्याचा संचय झाला आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात सरासरी 432 मीमी पाऊस पड़ला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत असताना, तीन लघु पाटबंधारे प्रकल्पात 100 टक्के पाण्याचा संचय झाला आहे.

सिंधुदुर्गात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे.या मुसळधार पावसाने देवगड तालुक्याला चांगलेच झोडपून काढले.मागील 24 तासात देवगडला 87 मिमी पाऊस पडला तर गेल्या तीन दिवसांत देवगड तालुक्यात सरासरी 326 मिमी पाऊस कोसळला आहे.

मनमाडमध्ये बैलगाडी वाहून गेली

नांदगाव तालुक्यातील बोलठानसह घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडला, मुसळधार पावसामुळे बोलठाण नदीला पूर आला. शेतकाम आवरून बैलगाडीवरून घरी जाणाऱ्या शेतकऱ्याची बैलगाडी वाहून गेली. त्यात दोन्ही बैलांचा मृत्यू झाला, तर शेती आणि साहित्याचे नुकसान झाले.

हिंगोलीत पावसाची हजेरी

हिंगोली जिल्ह्यात मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशीपासून पावसाने हजेरी लावली. आज सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पेरणीच्या कामांना अडथळा आला आहे. तर पेरणी केलेल्या पिकांना दिलासा मिळाला. त्यामुळे बळीराजा काहीसा सुखावला आहे.

VIDEO : पुराच्या पाण्यात म्हशी वाहून गेल्या

संबंधित बातम्या 

Weather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा    

Panchaganga River | कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर

(Maharashtra and Mumbai rains update heavy rain slashes Kolhapur, Konkan, Panchaganga river overflow)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें