Mumbai News : कौटुंबिक वाद टोकाला गेला, संतापलेल्या पतीने आधी पत्नीला संपवलं; नंतर स्वत:लाही दिली जीवघेणी शिक्षा
मुंबईतील आग्रीपाडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ कौटुंबिक वादातून पतीने १९ वर्षीय पत्नीला संपवलं. यानंतर पतीने स्वतःलाही शिक्षा दिली.

घर-संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच, पती-पत्नीमध्येही वाद होतातच. घराघरांत हे दृश्य दिसतं, मात्र काही वाद इतके टोकाला जातात, की त्यानंतर संतापाच्या भरात नको ते होऊन बसतं आणि क्षणात संसार उद्ध्वस्त होतो. असंच काहीसं मुंबईतील आग्रीपाडा (Agripada) येथे घडलं. तिथे शुल्लक कारणावरून वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर जे घडलं त्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आग्रीपाडा येथून अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.
आग्रीपाडा भागात एका इसमाने कौटुंबिक वादातून त्याच्या 19 वर्षीय पत्नीची हत्या केली. एवढंच नव्हे तर पुढे त्याने स्वत:लाही भयानक शिक्षा करून घेत आपलं आयुष्य संपवलं, त्याने थेट आत्महत्याच केली. पोलिसांनी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार,आग्रीपाडा पोलीस ठाणे क्षेत्रातील काळापाणी चौकी एरियात पहाटे 5 च्या सुमारा ही मन हादरवणारी घटना घडली. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून दहशतीचं वातावरण आहे.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार,मोहम्मद एहसान शेख असं आरोपी पतीच नाव असून जन्नत एहसान शेख असं मृत पत्नीचं नाव आहे. आज एहसान आणि जन्नत यांच्या त काही मुद्यावरून भांडण झालं, पाहता पाहता तो वाद खूपच पेटला. त्याच रागाच्या भरात एहसान याने किचनमधील चाकू घेऊन जन्नतचा गळा चिरून तिची हत्या केली.
मात्र तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वत:वरही वार करून घेतले. त्याला तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याची मृत्यूशी झंज अपयशी ठरली. नायर रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत दांपत्य हे रोजंदारीवर काम करणारे मजूर होते अशी माहिती समोर आली आहे. या हत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अधिक तपास सुरू आहे.