कॉकरोच जनता पार्टीचा सर्वात मोठा विजय, सरकारचे तातडीचे आदेश काय? दीपके आता काय करणार?
अभिजीत दीपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीच्या 'स्कूल ठीक करो' अभियानाला मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व सरकारी शाळांची दुरुस्ती करण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत. जर्जर शाळांना वीज, पाणी, शौचालयांसारख्या मूलभूत सुविधा मिळणार आहेत. या विजयानंतर दीपके यांनी आता 'आदिवासी स्कूल ठीक करो' हे नवीन राष्ट्रीय अभियान सुरू केले आहे.

अभिजीत दीपके यांच्या नेतृत्त्वातील कॉकरोच जनता पार्टीचा सर्वात मोठा विजय झाला आहे. सीजेपीने सुरू केलेल्या स्कूल ठीक करो अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून त्याची आता सरकारनेही दखल घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने दीपकेंच्या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सरकारी शाळांची दुरुस्ती करण्याचे तातडीचे आदेश जारी केले आहेत. सरकारच्या या निर्णयाने दीपकेंना मोठं बळ मिळालं आहे. या यशानंतर अभिजीत दीपके यांनी आता अजून एक आंदोलनन सुरू केलं आहे.
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने सर्व सरकारी शाळांची दुरुस्ती करण्याचा महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. राज्याच्या ग्रामीण विकास विभागाने जर्जर झालेल्या आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या शाळांच्या सुधारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शाळांमध्ये वीज, पाणी, शौचालयांसारख्या सुविधा देण्यात येणार आहेत. ज्या शाळांमध्ये या सुविधा आहेत, पण त्यांची डागडुजी करण्याची गरज आहे, तिथे डागडुजीचे आदेश देण्यात आले आहेत.
बैठकीत काय झालं?
या आधी एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत जे आकडे सादर करण्यात आले, त्यावरून राज्यातील शाळांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचं आढळून आलं. राज्यात एकूण 63,836 जिल्हा परिषद शाळांपैकी 40,530 शाळांमध्ये मुलींच्या शौचालयाची अवस्था अत्यंत बिकट होती. तर 663 शाळांमध्ये विद्यार्थीनींसाठी शौचालयच नव्हते. 1,638 शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालयांची व्यवस्थाच नसल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीनुसार, आता गणपतीच्या सुट्ट्यांमध्ये या शाळांची डागडुजी केली जाणार आहे. तर उरलेलं काम दिवाळीच्या सुट्टीत केलं जाणार आहे. प्राधान्य म्हणून आधी शौचालये, क्लासरुमची डागडुजी केली जाणार आहे. ब्लॅकबोर्ड आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सरकारने यासाठी वित्त आयोगाचा निधी वापरण्यास मंजुरी दिली आहे.
आधी वाद, आता…
सीजेपीने शाळांबाबतची मोहीम हाती घेतल्यानंतर अनेक वादही झाले. अभिजीत दीपके आणि त्यांच्या टीमच्या शाळांच्या पाहणीवरून वाद झाला होता. अनेक ठिकाणी तर सीजेपीच्या कार्यकर्त्यांना शाळा परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. राजस्थानच्या जयपूरमधील एका गावात तर सीजेपीच्या कार्यकर्त्यांना पळून पळून मारहाण करण्यात आली होती. त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे, सीजेपी कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या गावकऱ्यांनी नंतर ठिय्या आंदोलन पुकारत सीजेपीचा निषेधही नोंदवला होता. तर, पोलिसांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला नसल्याचा आरोप सीजेपीने केला होता.
नव्या आंदोलनाची घोषणा
दरम्यान, दीपके यांनी आता नव्या आंदोलनाची घोषणा केली आहे. ‘फिक्स ट्राइबल स्कूल्स’ म्हणजे ‘आदिवासी स्कूल ठीक करो’ या अभियानाची घोषणा दीपके यांनी केली आहे. ही एक राष्ट्रीय मोहीम असणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. स्वातंत्र्याच्या आठ दशकानंतरही आदिवासी विद्यार्थी आणि त्यांच्या शैक्षणिक संस्थांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा दावाही दीपके यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातून या देशव्यापी आंदोलनाला सुरुवात झाली आहे. तर आशुतोष रांका हे गुजरातपासून सुरुवात करणार आहेत.