AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात

Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात

| Updated on: Sep 18, 2026 | 11:35 AM
Share

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या कथित ग्रहदशेसाठी होणाऱ्या दीपोत्सवावर टीका केली आहे, दुष्काळग्रस्त असताना लाखो रुपये खर्च होत असल्याचे म्हटले आहे. तसेच, एका दुर्दैवी मृत्यूशी संबंधित प्रकरणात त्यांना आणि ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी नेपाळ कनेक्शनमधून निधी मिळत असल्याचा गंभीर आरोपही राऊतांनी केला.

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह फुटीर गटाला देण्याचा निर्णय हा या शतकातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप राऊत यांनी केला. दबावाखाली आणि आर्थिक प्रलोभनामुळे आमचा पक्ष फुटीर गटाला देण्यात आला, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाचा हा कथित घोटाळा आता चव्हाट्यावर आला असून न्यायालयाच्याही लक्षात तो आला आहे, असं राऊत म्हणाले.

मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी गेल्या काही वर्षांतील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून निवडणूक आयोग अमित शाहांचा घरगडी म्हणून काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या दबावाखाली बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटीर गटाला देण्यात आली, असं राऊत म्हणाले. आम्ही सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडूनही न्याय मिळाला नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

मूळ राजकीय पक्षाचं अस्तित्व महत्त्वाचं आहे, असा युक्तिवाद करत राऊत यांनी दहाव्या अनुसूचीचाही संदर्भ दिला. मूळ राजकीय पक्ष कोणता आहे, कोण फुटलं आणि कसं फुटलं हा त्यानंतरचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले. काल सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनीही मूळ राजकीय पक्षाच्या अस्तित्वाबाबत महत्त्वाचं निरीक्षण केल्याचा दावा राऊत यांनी केला.

धनुष्यबाण चिन्ह गोठवून ते फुटीर गटाला देण्याचा निर्णय हा शेकडो कोटींचा घोटाळा असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह घेण्याऐवजी फुटीर गटाने वेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवायला हवी होती, असं न्यायालयाने म्हटल्याचा दावा त्यांनी केला. तसेच तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षचिन्हांच्या प्रकरणांचा दाखला देत निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. ममता बॅनर्जी किंवा शरद पवार यांनी स्थापन केलेल्या पक्षातील आमदार फुटले म्हणून मूळ पक्षाचं अस्तित्व बदलत नाही, असा दावा त्यांनी केला.

निवडणूक आयोगाचे निर्णय अन्यायकारक पद्धतीने आणि दबावाखाली घेतले जात असतील तर देशातील लोकशाही धोक्यात असल्याचं संजय राऊत म्हणाले. “मोदींच्या वाढदिवसाला दिवे लावून लोकशाही वाचणार नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला. गेल्या काही वर्षांत देशात, न्यायालयात आणि निवडणूक आयोगात नेमकं काय घडलं, हे जनतेला माहिती आहे. आता आकाश मोकळं होताना दिसत असून भविष्यात या सर्व गोष्टी समोर येतील, असंही राऊत यांनी म्हटलं.

Published on: Sep 18, 2026 11:35 AM

Follow Us