मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उर्मिला मातोंडकरांचा प्रतिसाद, रक्तदानाला हजेरी

| Updated on: Dec 06, 2020 | 11:24 AM

जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी केलं होतं

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उर्मिला मातोंडकरांचा प्रतिसाद, रक्तदानाला हजेरी
Follow us on

मुंबई : शिवसेनेचा झेंडा हाती धरलेल्या प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) रक्तदान शिबिरात सहभागी होणार आहेत. मुंबईतील कूपर रुग्णालयात उर्मिला मातोंडकर रक्तदान करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात रक्ताची टंचाई असल्याचे सांगत जनतेला स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. (Actress Urmila Matondkar blood donation at Cooper Hospital)

“मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोना संकट काळात खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. ते सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत. आपुलकीने सर्वांशी बोलत आहेत. घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे ते सर्वांना समजवतात. त्यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्राला सांभाळलं त्याने मी प्रभावित झाली आहे. अशा नेतृत्वासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे”, अशी प्रतिक्रिया उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिली होती.

“गेल्या दहा महिन्यांचा काळ महाराष्ट्रासाठी खूप कठीण होता. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. जगभरातील लाखो लोक इथे येतात. कोरोना संकटाला तोंड देणं खूप कठीण होतं. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रावर प्रचंड नैसर्गिक संकटं आली. चक्रीवादळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. पण या काळात महाविकास आघाडी सरकारने केलेलं काम जबरदस्त आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे” असं उर्मिला म्हणाल्या होत्या.

राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी एक डिसेंबरला ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.

मुख्यमंत्र्यांचं आवाहन काय?

महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोव्हिड 19 च्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरु असल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे.

राज्यात रक्ताची टंचाई असून येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था आणि गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे. ऐच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

महाराष्ट्रातील रक्त पुरवठ्याची सद्यस्थिती काय?

सध्या महाराष्ट्रातील 344 रक्तपेढ्यांमध्ये 19 हजार 59 रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या 2 हजार 583 युनिट आणि मुंबईतील 58 रक्तपेढ्यांमध्ये 3 हजार 239 रक्ताच्या युनिट आणि 611 प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ 5 ते 7 दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे. (आकडेवारी – 4 डिसेंबरपर्यंत) (Actress Urmila Matondkar blood donation at Cooper Hospital)

फक्त कोव्हिड रुग्णांवरील उपचारासाठीच नाही, तर विविध शस्त्रक्रिया, बाळंतपण किंवा कर्करोग, थॅलसेमिया अशा आजारांमध्ये रक्ताची निकड असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या आणि प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या :

राज्यात रक्ताची टंचाई, जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन

उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र सांभाळला, कोरोना काळात कुटुंबप्रमुख बनले : उर्मिला मातोंडकर

(Actress Urmila Matondkar blood donation at Cooper Hospital)