सावरकर वाद : इतिहासावर किती दिवस बोलणार? : आदित्य ठाकरे

राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Aditya Thackeray comment on Savarkar).

सावरकर वाद : इतिहासावर किती दिवस बोलणार? : आदित्य ठाकरे

मुंबई : राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सावरकरांना भारतरत्न देण्यावरुन सुरु असलेल्या वादावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे (Aditya Thackeray comment on Savarkar). स्वातंत्र्यासाठी लढलेले सर्व स्वातंत्र्यसैनिक महान होते, ते आपली दैवतं आहेत. मात्र, किती दिवस इतिहासावर बोलत राहणार आहात. आता इतिहासाकडून शिकून, प्रेरण घेऊन आजचे प्रश्न साडवायला हवेत, असं मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं (Aditya Thackeray comment on Savarkar).

आदित्य ठाकरे म्हणाले, “काँग्रेस-शिवसेनेची युती कायम आहे. दोन वेगळ्या विचारधारा एकत्र येऊन काम करतात यालाच लोकशाही म्हणतात. आम्ही आमचे जे काही मतभेद आणि वेगळेपण आहे ते बाजूला ठेऊन महाराष्ट्रासाठी एकत्र आलो आहोत. भारतरत्न कुणाला द्यायचं हे भाजपच्या हातात आहे. त्यांनी ज्यांना द्यायचं आहे त्यांना द्यावं. मात्र, इतिहासावर किती दिवस बोलणार आहोत. इतिहासाकडून शिकावं, प्रेरणा घ्यावी आणि आजचे प्रश्न सोडवावेत.”

सावरकरांसारखे अनेक महापुरुष या देशाची रत्नेच आहेत. त्यांनाही असे वाद पाहून वाईट वाटेल. सध्या देशात जे सुरु आहे हे बघून महापुरुषांनाही लाज वाटेल. देशाची अर्थव्यवस्था, देशातील समस्यांवर लक्ष देऊन त्यावर काम करायला हवं. ते असते तर तेही हेच म्हणाले असते, असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

“मुंबई 24 तासमुळे रोजगार तिप्पट होऊ शकतो”

आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईकरांनी मुंबई 24 तासचं स्वागत केलं आहे. जगभरात पाहिलं तर लंडनची नाईट टाईम इकॉनॉमी 5 बिलियन पाऊंडची आहे. दुकानं, हॉटेल्स आणि थिएअटरसोबत बीएसटीच्या बस ओला, उबर, टॅक्सी, रिक्षा यांच्याही उत्पादनात वाढ होणार आहे. आत्ताही मुंबई 24 तास सुरुच राहते. कितीतरी अशी ठिकाणं आहेत जिथं रात्रभर हॉटेल्स सुरु असतात. या इकॉनॉमिला अधिकृत करणं गरजेचं आहे. म्हणजे यांच्या उत्पादनासोबत राज्याकडेही कर येईल. यामुळे रोजगारही तिप्पट होऊ शकतो.”

लंडनसोबतच इंदोरमध्ये सराफा मार्केटला गेलं तर दिवसा तेथे दुकानं असतात, रात्री याच दुकानांच्या जागेवर चॅट मिळतात. इंदौरी चॅट आणि असे अनेक पदार्थ येथे मिळतात. अहमदाबादमध्ये देखील मागच्या वर्षी ही योजना राबवण्यात आली. मी तर ही मागणी 2013 लाच केली होती. मात्र, आत्ता ही योजना प्रत्यक्षात आली. मागील सरकारने पाच वर्षे मागासलेल्या विचारांमुळे यावर अंमलबजावणी केली नाही. मात्र, आता ही योजना राबवली जाईल. जगभरात या गोष्टी होत असताना विरोधकांना केवळ मुंबईने मागे राहावं असं वाटत असेल तर त्यांनी ते मनात घेऊन बसावं. मात्र, मुंबई 24 तास चालणारं शहर आहे. दिवसरात्र कष्ट करणारे लोकं मुंबईत राहतात. म्हणून मुंबईत 24 तास या सेवा मिळाव्यात हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी ड्राय डे आणि मुंबई 24 तास निर्णयाचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, “एक्साईजचा कायदा अगदी वेगळा आहे. त्याचा आणि मुंबई 24 तासचा संबंध नाही. त्या कायद्याशी आमचं काहीही देणंघेणं नाही. आम्ही लोकांना केवळ आवश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठी सुविधा देत आहोत. यात गार्डन-पार्कमध्ये जाणं, चित्रपटगृह, हॉटेल, रेस्टॉरन्टमध्ये जाणं, आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदी वेळ घालवणं याचा यात समावेश आहे. दारुचा आणि मुंबई 24 तासचा संबंध नाही. तुम्ही कधीही बाहेर जाऊन कपडे खरेदी करु शकतात, जेवण करु शकतात.”

“शिर्डीत येणाऱ्या भक्तांची गैरसोय होता कामा नये”

शिर्डीच्या मुद्द्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “शिर्डीत येणाऱ्या भक्तांची गैरसोय होता कामा नये. ट्रस्टच्या मनात जे असेल ते त्यांनी मांडावं. मात्र यात भक्तांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे.”