
अयोध्येत काल राम मंदिरावर धर्मध्वज फडकवण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज हजर होते. तर आज संविधान दिन साजरा होत आहे. या सर्व घडामोडींची सांगड घालत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधला आहे. संविधान वाचवण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र आले पाहिजे तर देशाचा विकास साध्य होईल असे आंबेडकर म्हणाले.
७५ वर्षांनी पुन्हा तेच केलं
संविधान दिनानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वक्तव्याचा उल्लेख त्यांनी केला. बनारस विश्वविद्यालयात बाबासाहेबांनी हे विधान केलं होतं. भारतीय नागरीक हा क्रॉस रोडवर आहे. अथवा समांतर जाणाऱ्या रेल्वे रुळावर आहे. हे दोन्ही कधी एकमेकांना भिडणार नाहीत. समाविष्ट होणार नाहीत म्हणून भारतीय जनतेने ताबडतोब निर्णय करायला हवा की त्यांना संविधानाचा मार्ग, समता, स्वातंत्र्य, बंधुता, अभिमानाचा मार्ग हा स्वीकारायचा की मनुस्मृतीने दिलेली आपमानित व्यवस्था की ज्यात एकमेकांचा द्वेष करणे, एकमेकांना न स्वीकारणे हा एक मार्ग आहे. यापैकी एक मार्गच भारतीय जनतेने निवडावा. तरच देशाची प्रगती आणि विकासाला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल अशा आशयाचे ते वक्तव्य होते.
या वक्तव्याचा आधार घेत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर निशाणा साधला. ७५ वर्षांनी ही RSS BJP यांनी दाखवून दिलं की जे त्यांनी १९५०ला नागपूरमध्ये केलं .. एका बाजूला भारतीय झेंडा लावण्यात आला आणि दुसरा बाजूला भगवा झेंडा लावण्यात आला आणि काल अयोध्याला ही तोच झेंडा लावण्यात आला. संविधान वादी एका बाजूला आणि संविंधान न मानणारे दुसरा बाजूला आहेत, असं सांगत देशातील सेक्युलर पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन आंबेडकरांनी यावेळी केले.
संविधान बदलण्याचा डाव
तर भारतीय संविधान बदलण्याचा भाजप आणि संघ परिवाराचा घाट असल्याचा आरोपही त्यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची आता खात्री देता येत नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. या संकटाची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी पुरोगामाऱ्यावर असल्याचे ते म्हणाले. ही काळाची हाक असल्याचे आवाहन त्यांनी केले. देशात विरोधी पक्ष शिल्लक नसल्याने सामान्यांचे प्रश्न पुढे येत नसल्याचा दावा त्यांनी केला. सध्या जाती-धर्मांमध्ये भांडणं लावण्यात येत आहेत. तर मोदींमुळे भारत जगात एकटा पडल्याचे चित्र असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला.