मुख्यमंत्र्यांच्या अभिवादानंतर ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण

| Updated on: Nov 17, 2022 | 10:18 AM

एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह शिवतीर्थावरुन निघाल्यानंतर लगेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं.

मुख्यमंत्र्यांच्या अभिवादानंतर ठाकरे गटाकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचं गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण
Follow us on

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदार आणि मंत्र्यांसह बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. शिंदे आपल्या आमदारांसह शिवतीर्थावर दाखल झाले. त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर ते आपल्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. पण शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह शिवतीर्थावरुन निघाल्यानंतर लगेच ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले. त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं.

एकनाथ शिंदे शिवतीर्थावरुन निघून गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाची जागा शुद्ध करण्यासाठी शिवतीर्थावर गोमूत्र शिंपडलं. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी कार्यकर्त्यांसोबत खासदार अरविंद सावंत हे देखील उपस्थित होते.

दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी एकनाथ शिंदेही स्मृतीस्थावर अभिवादनासाठी गेले तर शिंदे-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत आपल्या सर्व आमदारांसह आधीच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.

हे सुद्धा वाचा

“बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या दहावा स्मृतीदिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आम्ही त्यांना अभिवादन करायला आलोय. हिंदुत्ववादी विचारांच्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांच्या आठवणीशिवाय एक क्षणही जाणार नाही. ही वस्तूस्थीती आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन केल्यानंतर दिली होती.

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी आधीच अभिवादन केलं

महाराष्ट्रात साडेतीन महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार होतं. पण एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने हे सरकार पडलं. त्यांच्या बंडाने शिवसेनेत मोठी फूट पडली. शिवसेनेचे थेट दोन गट पडले. एक म्हणजे ठाकरे गट तर दुसरा शिंदे गट.

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं. तेव्हापासून ठाकरे आणि शिंदे गटात प्रचंड राजकीय संघर्ष बघायला मिळतोय. अनेक ठिकाणी शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याचं बघायला मिळालंय.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरात ठाकरे-शिंदे गट यांच्यात हाणामारी झाली होती. तसेच काही दिवसांपूर्वी आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते यांच्यातही वाद झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाच्या आधी शिवतीर्थावर दाखल होत बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं.