ठिणग्या पडल्या… औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर नामंजूर, असदुद्दीन ओवैसी भडकले; म्हणाले, हमारे इलाके का…

| Updated on: Feb 25, 2023 | 2:45 PM

औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच महाराष्ट्रातील सामान्य प्रशासन विभागानेही राजपत्रक काढलं आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे.

ठिणग्या पडल्या... औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर नामंजूर, असदुद्दीन ओवैसी भडकले; म्हणाले, हमारे इलाके का...
Asaduddin Owaisi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : उस्मानाबादचे धाराशीव आणि औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं सर्वच राजकीय पक्षांनी जल्लोषात स्वागत केलं आहे. मात्र, एमआयएमने या नामांतराला विरोध केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. नामांतराच्या या निर्णयावर एमआयएमचे नेते असदुद्दीन औवैसीही प्रचंड भडकले आहेत. ओवैसी यांनी या निर्णयावरून केंद्र सरकारसह राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ही तर हुकूमशाही आहे, अशी टीकाच ओवैसी यांनी केली आहे.

आमच्या जिल्ह्याच्या बाबत आमच्या जिल्ह्यातील लोकं निर्णय घेतील. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे घेणार नाही. आज त्यांच्याकडे आकडे आहेत. त्यामुळे लोकांना विश्वासात न घेता ते काहीही करत आहेत. ते योग्य नाही, अशी टीका असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. सरकार नेहमी एखाद्या ठिकाणाचं, पार्कचं किंवा शहराचं नाव बदलत असते. इतिहास चांगला असू शकतो. वाईट असू शकतो. पण इतिहास हा इतिहास आहे. त्याच्यात ढवळाढवळ करणं योग्य नाही. संपूर्ण जगातील हेरिटेज मॉन्यूमेंट औरंगाबादमध्ये आहेत. त्यामुळे नामांतराचा प्रत्येक पातळीवर परिणाम होईल. सर्व दस्ताऐवज बदलावे लागतील, असंही ओवैसी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

शिंदे, फडणवीस निर्णय घेऊ शकत नाहीत

आम्ही तर आधीही मोर्चा काढला होता. लोकांनी नामांतराला विरोधही केला होता. आज सरकारकडे आकडे आहेत. त्यामुळे लोकांना विश्वासात न घेता काहीही केलं जात आहे. ही हुकूमशाही आहे. आमच्या विभागाचा निर्णय आमचे लोकं घेतील. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस किंवा उद्धव ठाकरे घेऊ शकत नाहीत. नाव बदलल्याने पाणी मिळणार? रोजगार मिळणार? असा सवाल करतानाच आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्याही वर आहोत, असा मेसेजच केंद्र सरकारने दिला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

तर हल्लकल्लोळ उडाला असता

पंजाबमधील घटनेवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. हेच विधान मुस्लिमांनी केलं असतं तर देशात वाद निर्माण झाला असता. काल शहरात छोटा रिचार्ज आला होता. त्यांनाच आता तुम्ही हा प्रश्न विचारा. पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्था कसा आहे हे तुम्ही पाहतच आहात, असंही ते म्हणाले.

दरम्यान, औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच महाराष्ट्रातील सामान्य प्रशासन विभागानेही राजपत्रक काढलं आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. औरंगाबद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्यात आलं आहे. यापूर्वी देशात अनेक भागांचं नाव बदलण्यात आलं होतं. उत्तर प्रदेशात तर योगी सरकारने अनेक शहरं आणि रेल्वे स्थानकांची नावे बदलली आहेत.