
‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’च्या (FICCI) कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्याने मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले. त्यापैकी एक प्रश्न होता, “जर तुम्ही एका दिवसासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक बनलात आणि त्या चित्रपटाचं नाव ‘महाराष्ट्र’ असेल, तर पहिला सीन तुम्ही कोणता चित्रित कराल?” या प्रश्नावर फडणवीसांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं.
“महाराष्ट्रावर चित्रपट बनत असेल तर त्यातील पहिला सीन हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा असेल. ते राज्याभिषेकासाठी बसलेले असतील आणि इतक्या वर्षांच्या गुलामीनंतर पुन्हा एकदा स्वराज्याचं निर्माण.. हाच तो सीन असेल,” असं उत्तर फडणवीसांनी दिलं. त्यानंतर अक्षयने त्यांना राजकारणातील खरे हिरो कोण वाटतात, असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ असं उत्तर देत त्यामागील कारणसुद्धा सविस्तर सांगितलं.
“मी मराठी चित्रपटांचा खूप मोठा चाहता आहे. मराठी चित्रपटांचा स्क्रीनप्ले, पटकथा आणि जे मुद्दे त्यात मांडले जातात.. ते इतर ठिकाणी पहायला मिळत नाहीत. जेन झी वर्गापर्यंत मराठी चित्रपट पोहोचावेत, यासाठी तुमचा काही प्लॅन आहे का”, असा प्रश्न अक्षयने विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले, “मराठी रंगभूमीने मराठी चित्रपटांना ताकदवान बनवून ठेवलंय. कल्पकता आणि अभिव्यक्तीचं उत्तम उदाहरण मराठी नाटकांनी सादर केलंय. महाराष्ट्रात आजसुद्धा इतके मराठी नाटक बनतात आणि ते नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात. काहींनी तर दहा हजार शोजचा विश्वविक्रम केला आहे. नटरंग असो, दशावतार असो, सखाराम बाईंडर नाटक असो.. यांनाही जेन झीकडून पसंती मिळतेय. जेन झी प्रेक्षकवर्ग आता मराठी चित्रपटांशी जोडला जातोय”, असं उत्तर त्यांनी दिलं.
“एकेकाळी मराठी चित्रपटांना थिएटर मिळणं कठीण असायचं. एखादा ब्लॉकबस्टर चित्रपट आला, तर मराठी चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलावं लागायचं. परंतु आज एकाच दिवशी दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होतात आणि दोन्ही ब्लॉकबस्टर होतात. सरकार म्हणून आम्हीसुद्धा मराठी चित्रपटसृष्टीला मदत करतोय. त्यासाठी काही योजनासुद्धा आहेत. परंतु जेन झी वर्ग मराठी चित्रपटांसाठी अधिक कसा जोडला जाईल, यासाठी आम्ही नक्की काम करू”, असं आश्वासन त्यांनी दिलं.