
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. नांदेड येथे सभा घेतल्यानंतर त्यांनी मुंबईकडे कूच केले. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीतील भूमिकेसह इतर अनेक राजकीय घडामोडींबाबत या दौऱ्यात मंथन झाल्याचे समोर येत आहे. नांदेड दौऱ्यादरम्यान आपली संख्या अधिक मागे हटू नका. महायुतीमध्ये आपण मोठे भाऊ आहोत असे त्यांनी भाजप आमदारांना स्पष्ट बजावले. त्याचवेळी त्यांनी स्वपक्षीय आमदारांना कानमंत्र दिला. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होणार का? अशी चर्चा होत आहे.
आमदारांनी केली दादांची तक्रार
अमित शाह हे नांदेड येथे आले असता काही भाजप आमदारांनी अजितदादांची त्यांच्याकडे तक्रार केली. अजित पवारांच्या कुरघोड्यांना रोखा असा नाराजीचा सूर भाजप आमदारांनी आळवला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पण उपस्थित होती. दादांची तक्रार केल्यावर मोठे काही घडेल असे वाटत असतानाच अमित शाह यांनी या वादावर जालीम उपाय सुचवला आहे.
अमित शाह यांचा कानमंत्र
अजित पवार यांची तक्रार करणाऱ्या आमदारांना यावेळी अमित शाह यांनी कानमंत्र दिला. आपल्या आमदारांची संख्या अधिक आहे. अशात मागे हटू नका. प्रशासन आणि सरकार पातळीवर कामांचा आक्रमकपणे पाठपुरावा करा. इतका पाठपुरावा करा की अजितदादा यांनी माझ्याकडे तक्रार करावी. अजित पवार यांच्याविरुद्ध तक्रार करू नका. उलट सर्व मंत्र्यांच्या मागे लागा अशी सूचना अमित शाह यांनी आमदारांना केली. आपल्या महायुती म्हणूनच पुढे जायचं आहे, असंह अमित शाह यांनी सांगितले.
काय केली तक्रार
अजित पवार हे भाजपाची ताकद कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा सूर या आमदारांच्या तक्रारीचा होता. 2024 मधील विधानसभेतील भाजप आमदारासमोरील पराभूत उमेदवारांनाच दादा पाठबळ देत असल्याची तक्रार त्यांनी केली. भाजपा विरोधकांना अजितदादा ताकद पुरवत असल्याचा त्यांचा दावा होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाची ताकद कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा दावा तक्रारकर्त्या आमदारांचा होता.