दोन जिल्हाधिकारी, दोन पालकमंत्री असणाऱ्या शहरासाठी दोन आयुक्त का नसावेत..? अस्लम शेख यांचा सवाल

| Updated on: Jan 10, 2021 | 5:08 PM

जर मुंबईसाठी दोन जिल्हाधिकारी असतील, दोन पालकमंत्री असतील तर दोन आयुक्त का नसावेत, असा प्रश्न अस्लम शेख यांनी केला आहे. (Aslam Shakh Mumbai BJP)

दोन जिल्हाधिकारी, दोन पालकमंत्री असणाऱ्या शहरासाठी दोन आयुक्त का नसावेत..? अस्लम शेख यांचा सवाल
अस्लम शेख, पालकमंत्री मुंबई
Follow us on

मुंबई: वस्त्रोद्योग मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याची मागणी केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. भाजप (BJP) ,शिवसेना आणि काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी अस्लम शेख यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी हा मुंबईचे दोन तुकडे करण्याचा डाव असल्याचा आरोप केला होता. अस्लम शेख यांनी भाजपचे आरोप खोडून काढत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.”जर मुंबईसाठी दोन जिल्हाधिकारी असतील, दोन पालकमंत्री असतील तर दोन आयुक्त का नसावेत..?” असा प्रश्न अस्लम शेख यांनी भाजपा नेत्यांना विचारला आहे. (Aslam Shaikh asked questions to BJP leader over two commissioner issue)

मुंबईच्या लोकसंख्येत 30 टक्के वाढ

अस्लम शेख म्हणाले की, मागील दहा वर्षांमध्ये मुंबईची लोकसंख्या ३० टक्क्यांनी वाढली आहे. या वाढलेल्या लोकसंख्येला पायाभूत सोयीसुविधा पुरवताना संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे असल्या कारणाने मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी तासं-तास प्रवास करावा लागतो, असं अस्लम शेख म्हणाले.

दोन जिल्हाधिकारी, दोन पालकमंत्री असल्यानं मुंबई तुटली का?

मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय व्यवहार करणं सुलभ व्हावं यासाठी जर मुंबई उपनगरासाठी व शहरसाठी स्वंतत्र जिल्हाधिकारी आहेत. नागरिकांच्या समस्या समाधानाची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी दोन पालकमंत्री असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त नेमण्याच्या मुद्द्याला भाजपा नेत्यांचा विरोध का..?, असा सवाल अस्लम शेख यांनी विचारला आहे.दोन जिल्हाधिकारी व दोन पालकमंत्र्यांमुळे जर मुंबईचे विभाजन होत नसेल तर मुंबईसाठी दोन आयुक्त नेमणे हा मुंबई विभाजनाचा डाव कसा काय ठरु शकतो असा प्रश्न अस्लम शेख यांनी भाजपा नेत्यांना विचारला आहे.

काँग्रेसच्या रवी राजांची भूमिका

मुंबई महापालिकेला दोन आयुक्त असले पाहिजे, या अस्लम शेख यांच्या मागणीला काँग्रेस पक्षातूनच विरोध आहे. ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. मुंबई काँग्रेसकडून अशी कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही, असेही रवी राजा यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत एकच आयुक्त असावा, ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याशी बोलूनच ही भूमिका मांडत आहे, असेही रवी राजा यांना सांगितले. अस्लम शेख यांनी मंत्री म्हणून पत्रव्यवहार केला असला, तरी ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्यांनी याबाबत कोणाशीही चर्चा केलेली नाही, असेही रवी राजा म्हणाले.

अतुल भातखळकरांची आक्रमक भूमिका

मुंबईला दोन आयुक्त देण्याची अस्लम शेख यांची मागणी निंदनीय आहे. या मागणी आडून मुंबईचे तुकडे करण्याचे काँग्रेसचे षडयंत्र आहे. पण काँग्रेसचे हे षडयंत्र भाजप कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेते, आमदार अतुल भातखळकर यांनी दिला होता.


संबंधित बातम्या:

मुंबईला दोन पालिका आयुक्त हवे; पालकमंत्री अस्लम शेख यांची मागणी

मुंबई तोडण्याचा काँग्रेसचा डाव यशस्वी होऊ देणार नाही; भातखळकरांचा इशारा

(Aslam Shaikh slams and asked questions to BJP leader over two commissioner issue)