बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवी अपडेट, पोलिसांच्या चौकशीत नवा खुलासा

बाबा सिद्दीकी हत्याकांडात पोलिसांनी आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. नितीन सप्रे आणि रामफुलचंद कनोजिया हे मुख्य आरोपी असून त्यांनी शूटरला शस्त्रे पुरवली होती. अंबरनाथ, डोंबिवली आणि पनवेल येथून या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तुर्कस्तानमध्ये बनवलेले पिस्तूल वापरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण नऊ आरोपी अटक करण्यात आले असून पोलीस तपास सुरू आहे.

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात नवी अपडेट, पोलिसांच्या चौकशीत नवा खुलासा
| Updated on: Oct 18, 2024 | 8:16 PM
Baba Siddique Murder: माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज आणखी 5 आरोपींना अटक केलीये. नितीन सप्रे, रामफुलचंद कनोजिया, संभाजी किशोर पारधी, प्रदीप दत्तू ठोंबरे, चेतन पारधी अशा या आरोपींची नावे आहेत. ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी माहिती दिली की, नितीन सप्रे आणि राम कनोजिया हे मुख्य आरोपी आहेत. या आरोपींनी शूटर्सना तीन शस्त्रे दिली होती. पोलिसांनी ही शस्त्रे आधीच जप्त केली आहेत. सप्टेंबरमध्ये हे दोन शूटर कर्जतमध्ये दोन मुख्य आरोपींसोबत थांबले होते. आरोपींनी या शूटर्सना काही पैसेही देखील दिले होते. आरोपींनी शस्त्रे कसे वापरायचे याचा सराव कुठे केला याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

पोलिसांनी माहिती दिली की, आरोपी नितीन सप्रे याला डोंबिवलीतून, रामफुलचंद कनोजियाला पनवेलमधून, संभाजी किशोर पारधी, प्रदीप दत्तू ठोंबरे आणि चेतन पारधी यांना अंबरनाथमधून अटक करण्यात आली आहे. नितीन सप्रे हा मुख्य सूत्रधार असून तो शुभम लोणकरच्या संपर्कात होता. तर शिवकुमार आणि धर्मराज कुर्ल्यातील भाड्याच्या घरात जाण्यापूर्वी कर्जतमध्ये एका खोलीत राहिले होते.

तुर्कियेमध्ये बनवलेल्या पिस्तुलाने हत्या

पोलिसांनी आज या हत्या प्रकरणात पहाटे पाच आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी जे हत्यार वापरण्यात आले होते ते तुर्कियेमध्ये बनवले आहे. ही 7.62 एमएमची टिसास पिस्तूल आहे. बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्यावर 12 ऑक्टोबर रोजी निर्मल नगर येथे झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आधी २ जणांना अटक केली होती. त्यानंतर आणखी २ जणांना अटक केली आणि आज आता ५ जणांना अटक केली आहे.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. पण पोलिसांनी याबाबात कोणतीही माहिती दिलेली नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. वेगवेगळ्या अँगलने या प्रकरणात चौकशी सुरु आहे. त्यामुळे यामागे खरंच लॉरेन्स बिश्नोई गँग आहे की ना याचा ही शोध सुरु आहे.