Baba Siddiqui: बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या प्रकरणात संशयिताचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीचा हत्येमध्ये थेट सहभाग असल्याचा हवाला न्यायालयाने यावेळी दिला.

Baba Siddiqui: बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर
Baba Siddiqui
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 12, 2025 | 9:50 AM

माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात संशयिताचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमध्ये थेट सहभाग असल्याचा हवाला देत विशेष मकोका न्यायालयाने आरोपी रफीक शेख याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. यावेळी न्यायालयाने सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांकडे लक्ष वेधलं. ज्यात जप्त केलेला दारूगोळा, कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) आणि सह-आरोपींच्या कबुलीजबाबांचा समावेश आहे. यातून शेखचा संघटित गुन्हेगारी टोळीतील सक्रिय सहभाग अधोरेखित होतो.

सुनावणीदरम्यान न्यायाधीश म्हणाले, “सहआरोपी मोहल आणि शिवकुमार गौतम यांच्या कबुलीजबाबामुळे प्रथमदर्शनी असं दिसून येतं की, आरोपीने जाणीवपूर्वक टोळीप्रमुख अनमोल बिष्णोई याला हत्येची सोय करण्यासाठी मदत केली आणि आपली सेवा दिली. प्रत्यक्षदर्शीच्या जबाबाने याला दुजोरा दिला आहे. अर्जदाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. जामिनावर सुटका झाल्यास त्याच्याकडून पुन्हा गुन्हा होण्याची शक्यता आहे.” आरोपपत्रात सीडीआरमध्ये प्रथमदर्शनी शेख आणि सहआरोपी यांच्यातील संभाषणं दिसून येत असल्याचंही न्यायालयाने यावेळी नमूद केलं. एका सहआरोपीच्या कबुलीजबाबानुसार, रफीक शेखला आर्थिक लाभ मिळालं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी 26 आरोपींवर मोक्का (महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम ॲक्ट) लावला आहे. बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रोजी त्यांचेच पुत्र आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केलं असता उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1), 109, 125 आणि 3(5), शस्त्रास्त्र कायद्याचे कलम 3, 5, 25 आणि 27 आणि कलम 37 आणि 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम (एमपीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्दिकींच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत एकूण 26 जणांना अटक करण्यात आली असून त्यात संशयित मुख्य शूटर शिवकुमार गौतमचा समावेश आहे. सिद्दिकींची हत्या आणि अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे.