बाळासाहेब चिडले… नाना मातोश्रीत आले आणि म्हणाले… काय घडला किस्सा? संजय राऊतांनी दिला आठवणींना उजाळा
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. नाना हे मराठी अस्मितेचा जागर करणारे, दानशूर आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते, असं संजय राऊत म्हणाले.

चतुरस्त्र अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. एक मोठा अभिनेता आणि सामाजिक जाणीव असलेला कलावंत गेल्याने प्रत्येकजण हेलावला आहे. नानांचे मित्र, सहकारी आणि सामान्य लोकही नानांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नानांनी बॉलिवूडमध्ये मराठी माणसांचा स्वाभिमान आणि अस्मिता जागृत ठेवली. मराठी माणूस किती संवेदनशील असतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांच्या सारखा अभिनेता होणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी नाना पाटेकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना नाना पाटेकर यांच्या आठवणी जागवल्या. नानांचा हिंदी सिनेमातील वावर दमदार मराठी माणूस म्हणूनच राहिला. स्वाभिमान आणि अस्मितेच्या बाबत मराठी माणूस किती संवेदनशील आहे नानाने दाखवून दिलं. नाना आणि बाळासाहेबांचं नातं जिव्हाळ्याचं होतं. मी अनेकदा पाहिलं. त्यावेळी नाना हे स्वत:ला शिवसैनिक म्हणून घेत असत. ते माहीमला राहायचे. मराठी माणसाच्या आंदोलनाला सदैव पाठिंबा द्यायचे. नाना उत्तम वाचण करणारा नट होता. त्यांना साहित्य आणि कवितेची उत्तम जाण होती. उत्तम मित्र होते. सर्वच राजकीय पक्षात त्यांचा वावर होता. ते अनेकदा राजकीय व्यासपीठावरून राजकीय नेत्यांना खडे बोलही सुनवायचे. नानांच्या जाण्याचा धक्का पचवणं कठिण आहे, असं संजय राऊत म्हणाले.
ताठमानेने जगण्याचा संदेश
नानांनी ताठमानेने जगण्याचा संदेश दिला. आपण समाजाचं देणं लागतो हे त्यांनी दाखवलं. नाना दानशूर होते. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केलं. त्यांनी अनेक संस्थांना पडद्यामागून मदत केली. त्याची कधी जाहीर वाच्यता केली नाही. त्यांचं जाणं चटका लावणारं आहे. पण त्यांचं स्मरण कायम राहील, असं राऊत म्हणाले.
माझ्या आजारपणात धीर दिला
नाना पाटेकर आपल्या आजारपणात सातत्याने फोन करून विचारपूस करत असल्याचंही राऊत यांनी सांगितलं. माझ्या आजारपणात नाना ही एकमेव व्यक्ती होती ते किमान एक दिवस आड जिथे असतील तिथून फोन करून धीर द्यायचे. नाना मला मार्गदर्शन करायचे. आहारात काय बदल केले पाहिजे हे सांगायचे. इतकं आत्मियतेने ते करत होते. त्यांच्या अचानक जाण्याने मीही अस्वस्थ आहे. दु:खी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही आमचे वडील…
नाना अजात शत्रू होते. वरून कठोर वाटत असले तरी तो हळव्या मनाचा संवेदनशील माणूस होता. नाना पाटेकर परखड होते, असं सांगताना राऊत यांनी नाना पाटेकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्साही सांगितला. शिवसेनाप्रमुखांनी पु. ल. देशपांडेंवर टीका केली होती. त्यावर नानाने भाष्य केलं होतं. तेव्हा शिवसेनाप्रमुख चिडले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाना दुसऱ्या मातोश्रीवर आले. बाळासाहेबांच्या समोर बसले. बाळासाहेब त्यांच्यावर रागावले. तेव्हा नाना म्हणाले, तुम्ही आमचे वडील आहात. तुम्हाला रागावण्याचा अधिकार आहे. नाना बाळासाहेबांना मार्गदर्शक आणि पित्या समान मानत होते. त्यानंतर त्यांनी बाळासाहेबांच्या अनेक भूमिकांना त्यांनी आपल्या भूमिकेतून पुढे नेले, असं राऊत यांनी सांगितलं.
नाना परखड बोलायचे
नानांनी त्यांची राजकीय मते नेहमीच व्यक्त केली आहेत. नाना इतर कलाकारांसारखे गप्प बसले नाहीत. जे पटलं नाही आणि जे पटलं ते नानाने परखडपणे बोलून दाखवलं. अनेक कलाकार, साहित्यिक जेव्हा बोलायचं असतं तेव्हा बोलत नाहीत. अदृश्य होतात. पण नाना तसे नव्हते. नाना बोलत राहिले. अनेकदा बोलत राहिले. मतं पटली असतील नसतील पण त्यांनी बोलण्याचा अधिकार कायम ठेवला होता, असंही त्यांनी सांगितलं.
आत्मचरित्र राहून गेलं
नानांनी माझ्याकडून नरकातील स्वर्ग पुस्तक मागवलं होतं. मी त्यांना म्हटलं तुम्ही पुस्तक लिहा. तुमच्या जीवनातील संघर्ष आला पाहिजे. तरुणांना तो कळला पाहिजे. तुम्ही लिहिल्याशिवाय तुमच्या संघर्षाचं महत्त्व लोकांना कळणार नाही, असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यावर काही नोंदी आणि टिपणी काढल्या आहेत. मी पुस्तक काढेन, असं ते म्हणाले होते, असंही त्यांनी सांगितलं.