
मुंबई, दि. 31 डिसेंबर 2023 | मुंबई लोकलला मुंबई शहराची लाईफलाईन म्हटली जाते. श्रीमंत असो की सर्वसामान्य सर्वांनी मुंबई लोकलमधून प्रवास करण्याचा अनुभव घेतला आहे. आता दिग्गज उद्योगपती आणि अब्जावधी रुपयांची संपत्ती असणाऱ्या व्यक्तीकडून आपल्या अनेक लग्झरी कार सोडून मुंबई लोकलने प्रवास केला. हे उद्योगपती म्हणजे रिअल इस्टेटमधील दिग्गज निरंजन हिरानंदानी (Niranjan Hiranandani) आहे. 12 हजार 487 कोटींची संपत्ती असणाऱ्या या अब्जाधीश उद्योगपतींनी मुंबई लोकलमधून प्रवास केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर हजारो जणांनी आपल्या कॉमेंटही व्यक्त केल्या आहेत.
73 वर्षीय अब्जाधीश आणि हिरानंदानी ग्रुपचे को-फाउंडर निरंजन हिरानंदानी यांनी शुक्रवार मुंबई लोकलमधून प्रवास केला. त्याचा व्हिडिओ त्यांनी आपल्या इंस्टाग्राम (Niranjan Hiranandani Instagram Post) अकाउंटवर शेअर केला. व्हिडिओमध्ये सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे ते लोकलची वाट पाहताना दिसत आहेत. लोकल आल्यानंतर डब्यात जाऊन बसत आहेत. यावेळी त्यांच्या सोबत त्यांच्या टीममधील काही सदस्य आहेत. लोकलच्या खिडकीजवळील सीटवर ते बसल्यानंतर अनेक जणांनी त्यांच्याशी हस्तांदोलन करत संवाद साधला.
हिरानंदानी यांनी आपल्या लोकल प्रवासाचे कारण व्हिडिओ शेअर करताना दिले आहे. व्हिडिओसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले की, मुंबई शहरातील वाहतूक कोडींतून सुटका मिळवणे आणि वेळ वाचवण्यासाठी मी लोकलने प्रवास केला. एसी कोचमध्ये मुंबई ते उल्हासनगरपर्यंत हा प्रवास होता. या व्हिडिओ २२ दक्षलक्ष लोकांनी पाहिले आहे. सहा लाखांपेक्षा जास्त जणांनी व्हिडिओ लाईक केला आहे. अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हिरानंदानी यांच्या मुंबई लोकलमधील प्रवासासंदर्भात कौतूक केले आहे. एका युजरने हिरानंदनी हे जमीनशी नाळ जोडलेले व्यक्तीमत्व असल्याचे म्हटले आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने त्यांना आपला आदर्श म्हणत भेटीची इच्छी व्यक्त केली आहे. एकंदरीत हिरानंदनी यांचा मुंबई लोकलमधून प्रवास मुंबईकरांना चांगलाच भावला आहे.