
“शिवसेना-भाजपमधील संबंध अजिबात ताणले गेलेले नाहीत. काल खेळीमेळीच्या वातावरणात त्यांच्याबरोबर चर्चा झाली आहे. देवेंद्र फडणवीस दावोसला आहेत, ते दावोसहून एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. दिवसातून किमान एकदा त्यांच्यात राज्याच्या अनेक विषयाबरोबर महापालिका विषयावर चर्चा होते” असं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले. “महायुतीचे 118 नगरसेवक, नगरसेविका निवडून आल्या आहेत. त्यामुळे महायुतीचा महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होईल. महायुतीच्या 118 नगरसेवक, नगरसेविकांपैकी कोण महापौरपदी विराजमान होईल हे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले चर्चा करुन ठरवतील” असं अमित साटम म्हणाले.
“महापालिकेत सर्व पदं महायुतीला मिळतील. भाजप, शिवसेना, रिपाई सर्व मिळून एकमेकांशी चर्चा करुन कुठल्या कमिटीचं अध्यक्षपद कोणाला द्यायचं? त्या कमिटीला न्याय कोण देऊ शकेल? कोणाला अनुभव आहे? मुंबईला भ्रष्टाचाररहित प्रशासन द्यायचं आहे. मुंबई शहरात विकास घडवून आणायचा आहे. मुंबईची सुरक्षा अबाधित ठेवायची आहे. या सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन निर्णय घेण्यात येईल. कुठलही सत्तेच स्थान काबीज करण्यासाठी निर्णय होणार नाही. मुंबईकरांचं जीवनमान चांगलं करण्याच्या दृष्टीकोनातून निर्णय होईल” असं अमित साटम म्हणाले.
मुस्लिम बहुल भागातील जागा दिल्यामुळे शिवसेना हरली का?
शिवसेनेला मुस्लिम बहुल भागातील जागा दिल्या गेल्या. त्यामुळे त्यांचा पराभव झाला अशी चर्चा आहे. त्यावर अमित साटम म्हणाले की, “जागा वाटपाची डिटेल चर्चा झाली. कुठल्या वॉर्डात कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता निवडून येऊ शकतो. जनभावना काय आहे. कुठला पक्ष संघटनात्मक दृष्टया सक्षम आहे. हे पाहण्यात आलं. त्यानंतर निर्णय झाला” असं अमित साटम यांनी सांगितलं.
समाधान सरवणकर यांच्याबद्दल काय म्हटलं?
समाधान सरवणकर यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? यावरही ते बोलले. “समाधान सरवणकर फार कमी मतांनी पराभूत झाले आहेत. त्यांनी काही विषयांवर चिंता व्यक्त केली. त्यांनी चिंता व्यक्ती केली, त्याबद्दल सत्यता तपासू. त्याची माहिती त्यांच्याकडून आणि इतरांकडून घेऊ. सर्व गोष्टींचा सारासार विचार करुन निर्णय घेऊ. त्यांनी भाजपवर आक्षेप नोंदवलेला नाही. त्यांनी विशिष्ट लोकांवर आक्षेप नोंदवलाय” असं अमित साटम यांनी म्हटलं. “भाजपवर माझा आक्षेप नाही असं म्हटलय. त्यांचा निशाणा भाजपवर नाही. त्यांचं वक्तव्य मी ऐकलं आहे. त्यांचा निशाणा काही व्यक्तींवर आहे. आपसात चर्चा केल्याने प्रश्न चांगल्यारितीने सुटू शकतो. अशा प्रकारच्या गोष्टी मीडियासमोर बोलणं टाळलं पाहिजे” असा सल्ला अमित साटम यांनी दिला.