Blinkit च्या गोदामावर एफडीएची मोठी कारवाई; अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचे अधिकारीही चक्रावले

Blinkit: मुंबईतल्या मालाड परिसरातील ब्लिंकिटच्या गोदामावर एफडीएनं धडक कारवाई केली आहे. या गोदामात झुरळांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Blinkit च्या गोदामावर एफडीएची मोठी कारवाई; अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचे अधिकारीही चक्रावले
Blinkit
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 11, 2026 | 9:03 AM

अवघ्या काही मिनिटांत फास्ट डिलिव्हरी देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेड लिमिटेड’च्या (Blinkit) गोदामावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील मालाड परिसरातील ब्लिंकिटच्या गोदामावर तुकाराम मुंढे यांच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ही धडक कारवाई केली आहे. एफडीएनं या गोदामाचा अन्न परवाना निलंबित केला आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव आणि वस्तूंच्या अयोग्य साठवणुकीमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 7 ऑगस्ट रोजी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या गोदामाची अचानक पाहणी केली.

ब्लिंकिटच्या गोदामात अस्वच्छतेचं साम्राज्य

मालाड पश्चिम इथल्या सर्वोदय भुवनमधील ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सुविधेची तपासणी केली असता अत्यंत अस्वच्छ परिस्थिती, झुरळांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव, अन्नाची अयोग्य साठवणूक आणि शीतगृहात अपुरी स्वच्छता आढळून आल्याची माहिती एफडीएनं एका निवेदनात दिली आहे. तपासणीत मुदत संपलेले आणि छेडछाड केलेले पॅकेज्ड फूड, तसंच FIFO/FEFO (फर्स्ट इन फर्स्ट आऊट आणि फर्स्ट एक्स्पायर्ड फर्स्ट आऊट) पद्धतींचंही पालन न केल्याचं आढळून आलं. कचरा व्यवस्थापन, देखभालीतील त्रुटी, अन्न हाताळणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि आरोग्य नोंदींचा अभाव, आवश्यक वैयक्तिक स्वच्छता यांचीही कमतरता या गोदामात आढळली.

झुरळांचा प्रादुर्भाव

भाजीपाला आणि फळं साठवण्याच्या जागेत झुरळांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आला. इतकंच नव्हे तर कोल्ड रुममध्ये मुदत संपलेली, खराब झालेली किंवा छेडछाड केलेली पॅकेजेसदेखील आढळली, अशी माहिती एफडीएनं दिली आहे. यामुळेच या गोदामाचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने आणि पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. एफडीएचे नवीन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात धडक कारवायांचं सत्र सुरूच आहे. अन्न सुरक्षा मानकांची अंमलबजावणी तीव्र केल्यामुळे विविध ठिकाणी नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्याचं उघडकीस येत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील एआरडी सिनेमाल इथल्या रिलायन्स रिटेलच्या एका आऊटलेटवरही एफडीएनं कारवाई केली आहे. एका लोकप्रिय मिठाईमध्ये जिवंत अळ्या आढळल्याची तक्रार मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us