BMC Election 2026: मोठी बातमी! मुंबईत ठाकरे सेना इतक्या जागा जिंकणार, तर मनसे…भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांचे निकालापूर्वीच मोठे भाष्य

BMC Election 2026 Chandrakant Patil: मुंबई महापालिकेकडे राज्याचेच नाही तर देशाचं लक्ष्य लागलं आहे. या महापालिकेत कोण मुसंडी मारणार आणि महापौर कुणाचा बसणार? याची चर्चा आणि गणितं मांडण्यात येत आहे. दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी निकालापूर्वीच मोठे भाष्य केले आहे. मनसेला आणि उद्धव सेनेला किती जागांवर विजय मिळणार?

BMC Election 2026: मोठी बातमी! मुंबईत ठाकरे सेना इतक्या जागा जिंकणार, तर मनसे...भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांचे निकालापूर्वीच मोठे भाष्य
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 13, 2026 | 11:52 AM

Uddhav Thackeray Shivsena And MNS Will Win Seats: आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या आणि एखाद्या छोट्या देशाइतकं बजेट असलेल्या मुंबई महापालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार? याची जोरदार चर्चा सुरू आहे. महापौर कुणाचा असणार? 20 वर्षांनी एकत्र येत असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांना किती जागांवर विजय मिळणार याची चर्चा रंगली आहे. याविषयीचे गणितं मांडण्यात येत आहे. भाजप आणि शिंदेसेना किती जागांवर येणार, काँग्रेसचे किती उमेदवार निवडून येणार यावर राज्यातही चर्चा होत आहे. तर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी तर निकालापूर्वीच उद्धव सेना आणि मनसेला किती जागा मिळतील याचा आकडा सांगून टाकलाय.त्याचीच मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सर्वाधिक महापौर भाजपचेच

सांगली महापालिकेत भाजपचाच महापौर होईल असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी छातीठोकपणे सांगितले. तर इतक्यावर न थांबता, त्यांनी राज्यात किती ठिकाणी भाजप-महायुतीचे महापौर येतील याविषयीचे वक्तव्य केले आहे. राज्यातील 29 पैकी 28 महानगरपालिकेत युतीचे महापौर होतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. तर यामध्ये सर्वाधिक महापौर हे भाजपचेच असतील असा दावा पण चंद्रकांतदादांनी केला. अजून मतदानाला एक दिवस शिल्लक असताना आणि निकाल यायला दोन दिवस बाकी असताना चंद्रकांतदादांनी राज्यातील महापालिकेतील सत्ता समीकरणाचा सारीपाटा सर्वांसमोर आणला आहे.

मुंबईत उद्धव सेना-मनसेला किती जागा?

मुंबई महापालिकेचा गड खेचून आणण्यासाठी भाजप आणि शिंदेसेनेने कंबर कसली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव सेना आणि मनसेवर टीकेची झोड उडवली आहे. मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा निवडणुकीत ऐरणीवर आला आहे. तर भाजपने या मुद्यांसह विकासाचा रोडमॅपही मांडला आहे. तर उद्धव सेना आणि मनसेने सुद्धा विकासाचे व्हिझन समोर आणले आहे. त्यामुळे या निवडणुकीत या दोघांपैकी कोण उजवं ठरणार याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे या दोघांना किती जागा मिळणार याचं गणितच चंद्रकांत दादा पाटील यांनी मांडलं आहे.

मुंबईत ठाकरेंच्या सेनेला 45 तर मनसेला 20 जागा मिळतील असे भाकीत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले. तर मी संख्या सांगण्यात माहिर मानल्या जातो. भाजपच्या आणि शिवसेनेच्या किती जागा निवडून येणार हे मी कानात सांगेन, असे मिश्किल उत्तरही दादांनी दिले. तर उद्धव सेनेला 45 आणि राज ठाकरे यांच्या पक्षाला 20, त्या पुढं गाडी बंद.पुढे महापौर करण्यासाठीच्या 11 पैकी एक दोन नगरसेवक त्यांचे असतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आता या आकडेमोडीवर ठाकरे गोटातून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.