
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा फैसला करण्यासाठी आज मुंबईकर आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. मुंबईतील सर्वच मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र मतदानाच्या सुरुवातीच्या तासांतच दादरमधील वॉर्ड क्रमांक १९२ मध्ये मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. मुंबईतील दादर परिसरात पहिल्या दुबार मतदाराची नोंद झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दुबार मतदारांच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली होती. जर दुबार मतदार दिसला, तर त्याला तिथेच फोडून काढा, असे थेट आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. याच पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच ठाकरे गटाचे नेते हे मुंबईतील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर तैनात आहेत. त्यातच दादरच्या वॉर्ड १९२ मध्ये मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार हे स्वतः मतदान केंद्रावर उपस्थित असताना एका महिलेचे नाव दुबार यादीत असल्याचे समोर आले.
मनसे कार्यकर्त्यांनी यावर तात्काळ आक्षेप घेतला. संबंधित महिलेचे आधार कार्ड तपासल्यानंतर आणि तिच्याकडून रीतसर प्रतिज्ञापत्र (Affidavit) भरून घेतल्यानंतर तिला मतदान करण्याची परवानगी देण्यात आली. ही निवडणूक आयोगाची गंभीर चूक आहे, मतदार याद्यांचे काम योग्य पद्धतीने झाले नसल्याने गोंधळ उडत आहे असा आरोप यशवंत किल्लेदार यांनी यावेळी केला.
सध्या मुंबईतील सर्वाधिक हाय-व्होल्टेज लढत वॉर्ड १९२ मध्ये होत आहे. दादरचा हा वॉर्ड प्रतिष्ठेचा मानला जात असून येथे प्रामुख्याने दोन तगड्या उमेदवारांमध्ये सामना होत आहे. मनसेकडून यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून प्रीती पाटणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत उमेदवारांची संख्या अत्यंत मोठी असून एकूण १७०० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये पुरुष उमेदवारांची संख्या ८२२ असून महिला उमेदवारांनी यात आघाडी घेतली आहे, एकूण ८७८ महिला उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने ६४,३७५ कर्मचारी आणि ४,५०० स्वयंसेवकांची मोठी फळी तैनात केली आहे. मतदानासाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम यंत्रांची सुरक्षा अत्यंत कडक ठेवण्यात आली असून, एकूण ४५,००० हून अधिक कंट्रोल आणि बॅलेट युनिट्सचा वापर केला जात आहे