
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मच वाटप सुरु झालय. काल रात्री मातोश्रीवर बोलवून काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. आज सकाळी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येतील. दरम्यान एका उमेदवारीवरुन ठाकरे गटातल्या बड्या नेत्यांमध्ये नाराजी नाट्य रंगल्याची चर्चा आहे. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. ते तडक बैठक सोडून निघून गेल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांना उमेदवारी द्यायचीय. त्यांना काल रात्री मातोश्रीवर बोलवून घेण्यात आलं. रात्री 2.30 वाजेपर्यंत उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप आणि बैठकांच सत्र सुरु होतं. या दरम्यान वांद्र्यातील एका उमेदवारीवरुन अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई यांच्यात मतभेद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
वॉर्ड क्रमांक 95 च्या उमेदवारीवरुन अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात मतभेद झाले आहेत. वॉर्ड क्रमांक 95 मधून हरी शास्त्री यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते श्रीकांत सरमळकर यांचे जावई आहेत. श्रीकांत सरमळकर हे स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. हरी शास्त्री यांना उमेदवारी द्यायला अनिल परब यांचा विरोध होता. पण वरुण सरदेसाई मात्र शास्त्री यांच्या बाजूने होते. त्यावरुन मतभेद झाले. अनिल परब तडक मातोश्रीवरुन निघून गेले अशी सूत्रांची माहिती आहे.
कुठे एबी फॉर्म अजून दिलेले नाहीत?
वरुण सरदेसाई हे वांद्रयातून आमदार आहेत. अनिल परबही विधान परिषदेतून आमदार आहेत. वरुण सरदेसाई आणि अनिल परब दोघेही ठाकरे कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरेंचे नात्यामध्ये बंधु लागतात. आता मातोश्रीच्या जवळ असलेल्या या दोन नेत्यांमध्ये वाद झाला आहे. उद्धव ठाकरे गट आणि मनसे हे दोन्ही पक्ष मराठी मतांची फाटाफूट टाळण्यासाठी एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यांनी मागच्या आठवड्यात युती झाल्याचं जाहीर केलं आहे. पण ज्या जागांवर दोन्ही पक्षांमध्ये तिढा आहे, मतभेद आहेत तिथे मात्र अजून एबी फॉर्मचं वाटप केलेलं नाही.