
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरिता 29 आणि 30 डिसेंबर असे दोनच दिवस शिल्लक आहेत. मुंबई महापालिकेचे सर्वाधिक 227 प्रभाग आहेत. मोठमोठ्या राजकीय पक्षांची प्रतिष्ठा या निवडणुकीसाठी पणाला लागली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर करण्यात आले नव्हते. अशातच भाजपच्या 66 उमेदवारांची पहिली यादी समोर आली आहे. रविवारी रात्री काही उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्म्स देण्यात आले. या यादीतलं चर्चेतलं नाव म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निशा परुळेकर. निशा यांनी विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरल्या आहेत. भाजपकडून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
निशा परुळेकर यांनी ‘रमाबाई भीमराव आंबेडकर’, ‘बाबो’, ‘पारख नात्यांची’, ‘प्रेमाचे नाते’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1974 रोजी मुंबईत झाला. चेंबूरमधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकल्या. त्यांनी इंजीनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय. 2011 मध्ये ‘रमाबाई भीमराव आंबेडकर’ या चित्रपटांत त्यांनी रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारली होती.
निशा परुळेकर यांनी भरत जाधवसोबत ‘सही रे सही’ नाटकातसुद्धा काम केलंय. कोठारे व्हिजन्स निर्मित ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ या मालिकेत त्यांनी महालक्ष्मी अंबाबाईची भूमिका साकारली होती. अभिनय क्षेत्रात बरीच वर्षे काम केल्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं असून भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाजपने पहिल्या यादीत 66 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत रणरागिणींचा बोलबाला दिसून येतोय. भाजपची आज देशात आणि महाराष्ट्रात सत्ता आहे. पण मुंबई महापालिका हे त्यांचं अपूर्ण स्वप्न आहे. 2017 साली भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या. त्यांचे 82 नगरसेवक निवडून आले. पण मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही. याआधी ते शिवसेनेसोबत युतीमध्ये निवडणूक लढवत होते. त्यामुळे महापौर शिवसेनेचा व्हायचा.