मुंबई महापालिकेच्या आरक्षणाची लॉटरी फुटताच मोठा राजकीय भूकंप, दिग्गजांचे पत्ते कट, कोणाकोणाला धक्का?
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. २२७ वॉर्डांपैकी ११४ महिलांसाठी आणि ६१ ओबीसींसाठी आरक्षित झाले.

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनेक राजकीय पक्षांतील मातब्बर नेत्यांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई महापालिकेने २२७ वॉर्डांसाठी जाहीर झालेल्या या आरक्षणामुळे अनेक विद्यमान आणि माजी नगरसेवकांचे वॉर्ड महिलांसाठी किंवा आरक्षित प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे आता अनेक दिग्गजांना आता सुरक्षित वॉर्ड कोणते याचा शोध घ्यावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साधारण मुंबई महापालिकेतील २२७ वॉर्डांपैकी ७८ वॉर्ड आरक्षित प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये १५ वॉर्ड अनुसूचित जाती (SC) आणि २ वॉर्ड अनुसूचित जमाती (ST) साठी आरक्षित करण्यात आले आहेत. यातील सर्वाधिक ६१ वॉर्ड ओबीसी प्रवर्गासाठी (OBC) आरक्षित झाले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकूण २२७ पैकी ११४ म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
सर्वाधिक फटका अनुभवी सत्ताधारी-विरोधकांना
या आरक्षण सोडतीचा सर्वाधिक फटका अनुभवी सत्ताधारी-विरोधक अशा दोन्ही बाजूच्या नेत्यांना बसला आहे. माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर (वॉर्ड क्र. १) यांचा वॉर्ड ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याने त्यांना नवीन वॉर्डचा शोध घ्यावा लागणार आहे. तर भाजप नेते किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या (वॉर्ड क्र. १०८) यांचा वॉर्डही ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
तसेच ठाकरे गटाचे वरळीतील महत्त्वाचे नेते आशिष चेंबुरकर (वॉर्ड क्र. १९६) आणि घाटकोपरचे विभागप्रमुख सुरेश पाटील (वॉर्ड क्र. १२७) यांचे वॉर्ड सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाले आहेत. मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या स्नेहल आंबेकर (वॉर्ड क्र. १९८) यांच्या वॉर्डावर ओबीसी महिला आरक्षण असणार आहे. शिंदे गटाचे नेते आणि सलग चार वर्षे स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले यशवंत जाधव (वॉर्ड क्र. २०९) यांनाही मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांचा वॉर्ड सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे.
मुंबईच्या राजकारणात मोठ्या हालचाली
भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर (वॉर्ड क्र. २२७) यांचा वॉर्डही सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाला आहे. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (वॉर्ड क्र. १७६) यांचा वॉर्ड ओबीसी महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याने काँग्रेसलाही एका महत्त्वाच्या जागेवर फेरविचार करावा लागणार आहे. या आरक्षण सोडतीमुळे मुंबईच्या राजकारणात मोठ्या हालचाली होणार असल्याचे बोललं जात आहे. या आरक्षण सोडतीमुळे, निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांना वॉर्डांचे आणि उमेदवारांचे नवे गणित मांडावे लागणार आहे. अनेक मातब्बर, ज्येष्ठ आणि जुन्या नेत्यांना आता एकतर शेजारच्या वॉर्डांमध्ये जाऊन निवडणूक लढवावी लागणार आहे. किंवा आपल्या पत्नी-मुलीला निवडणूक रिंगणात उतरवून राजकीय वारसा जपण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे म्हटले जात आहे.
